मुंबई सेंट्रलहून दिल्लीकडे जाणाऱ्या ‘ऑगस्ट क्रांती राजधानी एक्स्प्रेस’ने बोरिवलीजवळ सिग्नल तोडल्याने गुरुवारी या मार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला. सिग्नलकडे दुर्लक्ष करून गाडी तशीच पुढे नेण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेत रेल्वे प्रशासनाने गाडीचा चालक व गार्ड या दोघांनाही बोरिवली स्थानकात उतरवून घेतले. सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने नोकरदारांना त्याचा फटका बसला.
ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेस सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बोरिवली स्थानकानजीक आली. यावेळी सिग्नल क्रमांक ५३ला न थांबता गाडी पुढेच निघून गेली. हा धोकादायक प्रकार असल्याने गाडी बोरिवली स्थानकावर थांबवण्यात आली. त्यामुळे विरारच्या दिशेने जाणाऱ्या जलद गाडय़ांचा खोळंबा झाला. अध्र्या तासानंतर या गाडय़ा धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. बोरिवली स्थानकावर ऑगस्ट क्रांती एक्स्प्रेसच्या चालकाला व गार्डला उतरवून घेण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर नवीन चालक व गार्ड यांच्यासह रात्री आठ वाजता गाडी पुढे रवाना झाली. परिणामी रात्री उशिरापर्यंत पश्चिम रेल्वेच्या जलद मार्गावरील उपनगरीय गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होत्या.

Story img Loader