मुंबई : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि मुंबई विभागातील तिकीट तपासनीसांमध्ये बसण्याच्या जागेवरून वाद झाला. त्यानंतर अधिकाऱ्याने तिकीट तपासनीसाला धमकी दिली. तसेच संतप्त झालेल्या अधिकाऱ्याने तिकीट तपासनीसावर मद्याप्राशनाचा आरोप केला. मात्र या वादात प्रतिष्ठित मानली जाणारी मुंबई – दिल्ली राजधानी एक्स्प्रेस जळगाव स्थानकातून तब्बल १३ मिनिटे उशिरा सुटली.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ विभागीय संचालन व्यवस्थापक रामनिवास मीना शुक्रवारी नाशिक रोड स्थानकाची पाहणी करीत होते. त्यानंतर जळगावकडे जाण्यासाठी गाडी क्रमांक २२२२१ राजधानी एक्स्प्रेसने नाशिक रोड येथून डबा क्रमांक ‘एच १ ए’मध्ये बसले. यावेळी त्यांचा ‘पीएनआर’ तयार केला नव्हता. नाशिक रोडवरून राजधानी सुटली असता स्वच्छतेच्या कारणासाठी तिकीट निरीक्षक निखिल राठोड यांनी त्यांना ‘ए’ डब्यात जाण्यास सांगितले. या डब्यांमधून उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रवास करीत होते. त्यामुळे आधी त्यांच्या डबा स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले होते. यामुळे मीना यांचा पारा चढला. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. ‘‘ घटनेची चौकशी सुरू आहे’’, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले.