राज्यात सर्वात जास्त पाऊस पडूनही जल व्यवस्थापनाच्या अभावी पाणी समस्येला तोंड देणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाची एक मोहीम कोकण भूमी प्रतिष्ठानने आखली आहे. लोकसहभागातून जल व्यवस्थापन या संकल्पनेतून साकारणाऱ्या या मोहिमेच्या प्रारंभी खेड येथील जगबुडी आणि राजापूर येथील अर्जुना या दोन नद्यांच्या बारमाही पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहे. मॅगसेसे पुरस्कार विजेते ‘जलपुरुष’ डॉ. राजेंद्र सिंह हेही या मोहिमेत सहभागी होणार असल्याने, कोकणातील या महत्त्वाकांक्षी मोहिमेतील सहभागींचा उत्साह वाढला आहे.
एका बाजूला सह्य़ाद्रीच्या पर्वतरांगा आणि दुसऱ्या बाजूला सागरी किनारा अशा अनुकूल परिस्थितीमुळे कोकणात पावसाची कमतरता नाही. पण तीव्र उतार व उगमापासून समुद्रापर्यंतचे कमी अंतर यांमुळे पावसाचे सर्व पाणी नद्या-नाल्यांवाटे समुद्राला मिळून वाया जाते. कोकणातील या जलसंपत्तीच्या नियोजनाबाबत आजवर फारसा गांभीर्याने विचारही झालेला नसल्याने, पावसाळ्यानंतर लगेचच सिंचन तसेच पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवण्यास सुरुवात होते आणि गावकऱ्यांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू होते. त्यामुळे जल व्यवस्थापन ही कोकणाची गरज ओळखून ‘लोकसहभागातून जल व्यवस्थापन’ अशी संकल्पना कोकण भूमी प्रतिष्ठानने मांडली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जल व्यवस्थापनतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांनीही या मोहिमेस मार्गदर्शन करण्याची तसेच सहभागाचीही तयारी दर्शविली आहे. कोकणातील तसेच मुंबईतील कोकणवासीयांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ९८१९०२७७४८ किंवा ०२२-२४१५५४१३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.
पहिल्या टप्प्यात या दोन नद्यांचे पुनर्भरण करून त्या बारमाही प्रवाही करणे, काठावरील परिसरात आधुनिक शेतीचे व्यवस्थापन, जागोजागी लहान धरणे बांधणे असे कार्यक्रम डॉ. राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात येणार आहेत.
येत्या १ ते ५ डिसेंबर या कालावधीत राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत मुंबई ते सावंतवाडी अशी ‘जल परिक्रमा’ आखण्यात आली असून त्यामध्येही
डॉ. राजेंद्र सिंह पाचही दिवस सहभागी होणार आहेत. कोकणातील नद्यांवर विविध कार्यक्रम, व्यवस्थापनाबाबत जनजागृती, तसेच जगबुडी व अर्जुना नदीच्या बारमाहीकरणाची सुरुवात असे या जल परिक्रमेचे स्वरूप असेल.
त्याआधी, ७ सप्टेंबर रोजी मुंबईत शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृहात
डॉ. सिंह यांच्या उपस्थितीत पाणी परिषदेचे आयोजनही करण्यात आले आहे, असे कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांनी सांगितले.