राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वाढत्या करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी घाबरून न जाण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे. राज्यात करोना रूग्णांची संख्या वाढत असली तरी त्यातील ८६ टक्के रूग्णांना सौम्य लक्षणं असून ते गृहविलगीकरणात आहेत. उर्वरित १४ टक्क्यांमध्येही केवळ २.८ टक्के रूग्ण गंभीर वर्गवारीत येतात, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. यावेळी त्यांनी राज्यात लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर देत असल्याचं सांगत केंद्राकडे अधिक लसींची मागणी करणार असल्याचं नमूद केलं.
राजेश टोपे म्हणाले, “आज महाराष्ट्रात सक्रीय कोरोना रूग्णांची संख्या २ लाख ४५ हजारांच्या दरम्यान आहे. त्यात दिलसादायक परिस्थिती आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही. जरी संख्या वाढत असली तरी त्यातला जमेचा भाग म्हणजे ८६ टक्के लोक गृहविलगीकरणात आहेत. त्यांना सर्दी-खोकला एवढाच त्रास आहे. उर्वरित १४ टक्के जे रूग्णालयात आहेत त्यातील आयसीयूत ०.९ टक्के रूग्ण आहेत. व्हेंटिलेटरवर ०.३२ टक्के, ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर ०.५९ टक्के, केवळ ऑक्सिजन बेड असलेल्या ठिकाणी १.८९ टक्के रूग्ण आहेत. म्हणजेच एकंदर २.८ टक्के रूग्ण गंभीर वर्गात आहेत.”
राज्यातील करोना मृत्यूदर किती?
“राज्यात सप्टेंबरमध्ये मृत्यूदर १.६१ टक्के इतका होता, ऑक्टोबरमध्ये १.७८ टक्के, नोव्हेंबरमध्ये १.७३ टक्के आणि डिसेंबरमध्ये ०.५० टक्के इतका होता. जानेवारीत आजपर्यंत हा मृत्यूदराचा आकडा ०.०३ टक्के इतका आहे,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
“राज्याची दररोज २ लाख आरटीपीसीआर चाचणीची क्षमता “
“राज्याची आरटीपीसीआर चाचणी करण्याची दररोजची क्षमता २ लाख चाचण्याची आहे. आपण त्या सर्व २ लाख चाचणी करत आहोत. याशिवाय सर्व जिल्हाधिकाऱ्यांना रॅपिड अँटिजन टेस्ट (RAT) करण्याच्याही सूचना आहेत. लोकही स्वतः चाचणी करून घेत आहेत,” असंही त्यांनी नमूद केलं.
“महाराष्ट्रात लसीकरणाचा दर कमी झालाय”
राजेश टोपे म्हणाले, “लसीकरणाचा दर कमी झालाय. आरोग्य कर्मचारी लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र, सध्या केवळ साडेसहा लाख लोकांचंच लसीकरण होत आहे एकेकाळी राज्यात दररोज ८-१० लाख लसीकरण होत होतं. ते चित्र कमी झालंय. त्याला गती प्राप्त झाली पाहिजे. यासाठी प्रशासनाला सूचना केल्या आहेत.”
हेही वाचा : निर्बंध लावत सरकार मनमानी कारभार करतंय म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांना राजेश टोपेंचं उत्तर, म्हणाले…
“राज्यात पहिला लसीचा डोस घेणाऱ्यांचं प्रमाण ९० टक्के झालंय. दोन डोस घेतलेल्यांचं प्रमाण ६२ टक्के आहे, तरीही आपण देशाच्या सरासरीच्या थोडे मागे आहोत. त्यामुळे ते योग्य नाही. आपण खरंतर मार्गदर्शक राज्य आहे. त्या दृष्टीने पुढे गेलं पाहिजे. आम्ही केंद्राकडे लसींची संख्या वाढवून मागितली आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.