गेले दोन महिने सुरू असलेल्या प्राध्यापकांच्या संपात तोडगा निघत नसल्यामुळे हतबल झालेल्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे शनिवारी धाव घेतली. प्राध्यापकांच्या आर्थिक मागण्यांबाबत पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना काही सूचना किंवा पर्यायांबाबत मार्गदर्शन केल्यास संप मिटेल, या आशेने टोपे यांनी पवारांकडे भूमिका मांडल्याचे समजते.
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी, सेट-नेट झालेल्या आणि न झालेल्या प्राध्यापकांना नियुक्तीच्या तारखेपासून सर्व लाभ मिळावेत, अशा प्राध्यापकांच्या प्रमुख मागण्या असून ते त्यावर ठाम आहेत. सेट-नेट न झालेल्या प्राध्यापकांच्या सेवा नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या निर्णयापासून गृहीत धरल्या जाणार आहेत. पण प्राध्यापकांना ते मान्य नाही आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीही याबाबत ठाम आहेत. त्यामुळे मध्यम मार्ग म्हणून केवळ निवृत्तीवेतनासाठी नियुक्तीच्या तारखेपासूनचा कालावधी गृहीत धरावा, असा पर्याय सुचविण्यात आला आहे. पण प्राध्यापकांना २००५ पासून लागू झालेली नवी निवृत्तीवेतन योजना मान्य नसून जुनी योजना लागू करण्याची त्यांची मागणी आहे. या मागण्या मंजूर करण्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा विरोध असल्याने संप लांबला आहे.
संपात तोडगा निघत नसून परीक्षा घेणे व निकाल लावणे विद्यापीठांना अवघड झाले आहे. त्यामुळे आता पवारांनी मध्यस्थी करावी किंवा तोडगा सुचवावा, अशी विनंती टोपे यांनी त्यांना केली आहे.

Story img Loader