राज्य शासनाकडून देण्यात येणारे ‘श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक’ आणि ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. या दोन्ही पुरस्कारांसाठी अनुक्रमे राजहंस प्रकाशन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची निवड करण्यात आली आहे. गुरुवारी रोजी सायंकाळी ६.०० वाजता रवींद्र नाटय़ मंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.   
‘श्री. पु. भागवत उत्कृष्ट प्रकाशक पुरस्कारा’चे स्वरूप ३ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे तर ‘विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कारा’चे स्वरूप ५ लाख रुपये, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे आहे. जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.
या पुरस्काराबाबत ‘लोकसत्ता’शी बोलताना राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर म्हणाले, श्री. पु. भागवत हे मराठी साहित्य आणि प्रकाशन क्षेत्रातील आदरणीय नाव आहे. एखादे व्रत निष्ठेने घ्यावे, तसे श्रीपुंनी आयुष्यभर संपादन आणि प्रकाशन हे व्रत म्हणून स्वीकारले. अशा श्रीपुंच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार राजहंस प्रकाशनाच्या हिरक महोत्सवी वर्षांत मिळाला, त्याबद्दल आनंद वाटतो. तर वसंत आबाजी डहाके यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, विंदा करंदीकर यांच्या नावाचा हा पुरस्कार मला जाहीर झाला, ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. करंदीकर यांनी कविता, काव्य समीक्षा, ललित लेखन आदी साहित्य प्रकारात खूप मोठे काम केले आहे. त्यांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासाठी मोलाचा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा