Rajinikanth meets Uddhav Thackeray : दिग्गज अभिनेते रजनीकांत यांनी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं मुंबई येथील निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्यावर जाऊन ठाकरे कुटुंबियांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीची राजकीय आणि सिने वर्तुळात चर्चा सुरू आहे. दरम्यान, ही कोणतीही राजकीय भेट नसून केवळ सदिच्छा भेट असल्याचे सांगितले जात आहे. याआधीदेखील रजनीकांत मुंबई दौऱ्यावर आलेले असताना ते शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना भेटले आहेत.
२००८ साली ‘रोबोट’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी रजनीकांत मुंबईत आले होते. तेव्हा ते बाळासाहेबांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. रजनीकांत हे बाळासाहेब ठाकरे यांचे चाहते आहेत. तसेच रजनीकांत यांचे ठाकरे कुटुंबीयांशी चांगले संबंधदेखील आहेत. त्यामुळेच रजनीकांत यांनी ही भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे.
रजनीकांत मातोश्रीवर आल्यानंतर ठाकरे कुटुंबाने त्यांच्यासोबत एक फोटो काढला. हा फोटो आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये आदित्य यांनी लिहिलं आहे की, “रजनीकांत जी पुन्हा एकदा मातोश्रीवर आल्याने खूप आनंद झाला.”
हे ही वाचा >> “आमची भाजपा-शिंदे गटाशी…” जागावाटपावरील बावनकुळेंच्या वक्तव्यावर बच्चू कडूंचं उत्तर
थलायवा वानखेडेवर
रजनीकांत यांना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्याचं निमंत्रण देण्यात आलं होतं. हा सामना पाहण्यासाठी ते काल (१७ मार्च) मुंबईत आले होते. कालच्या सामन्याइतकीच रजनीकांत यांच्या वानखेडेवरील उपस्थितीची खूप चर्चा झाली.