मुंबई : ‘मुन्नाभाई एम. बी. बी. एस.’ चित्रपट श्रुंखला लोकप्रिय झाल्यानंतर खऱ्या अर्थाने दिग्दर्शक राजकुमार हिरानीची जोडी जमली ती अभिनेता आमिर खानबरोबर. या जोडगोळीने केलेल्या ‘थ्री इडियट्स’ आणि ‘पीके’ या दोन्ही चित्रपटांनी अमाप यश मिळवले. आता जवळपास दशकभराने पुन्हा ही जोडी एका नव्या चरित्रपटाच्या निमित्ताने एकत्र येणार आहे.
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता. त्यानंतर या दोघांनी एकत्र काम केले नव्हते. आमिर खान आणि राजकुमार हिरानी गेली काही वर्ष एकत्रित चित्रपट करण्यासाठी प्रयत्नशील होते. हिरानी यांनी आमिरला काही कथाकल्पना ऐकवल्याही होत्या. अखेर हिरानी यांनी ऐकवलेली एक कथा आमिरच्या पसंतीस उतरली असून पटकथा लेखनाच्या प्रक्रियेलाही लवकरच सुरुवात होणार आहे. सध्या हिरानी आगामी ‘डंकी’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहेत. खुद्द हिरानी चार – साडेचार वर्षांनंतर दिग्दर्शक म्हणून ‘डंकी’ या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. शाहरुख खानबरोबरचा त्यांचा पहिला चित्रपट असलेला ‘डंकी’ या वर्षाच्या अखेरीस नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर हिरानी आमिरच्या चित्रपटावर काम सुरू करणार असल्याचे समजते.
हेही वाचा… ‘या’ कारणामुळे ‘ओह माय गॉड २’ करण्यास परेश रावल यांनी दिला नकार; अभिनेत्याने केला खुलासा, म्हणाले…
आमिर खानला त्यांनी ऐकवलेली कथा ही चरित्रपटाची असल्याचे सांगण्यात आले. ‘डंकी’चे प्रदर्शन आणि आमिरच्या चित्रपटाची पटकथा, तसेच निर्मितीपूर्व तयारी हे सगळे नियोजनानुसार पार पडले तर पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होईल.