पक्षनिष्ठेला तीन ‘म’चे बळ!
मराठवाडा, मराठा आणि महिला हे तीन ‘म’ बीडच्या रजनी पाटील यांना काँग्रेसची राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्यात फायदेशीर ठरले. गांधी घराण्याशी असलेली निष्ठा काँग्रेसमध्ये फळाला येते हे पाटील यांच्या उमेदवारीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले.
विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत उद्यापर्यंत आहे. काँग्रेसमध्ये उमेदवाराचे नाव ठरविण्याचा घोळ नेहमीप्रमाणे दोन दिवस घालण्यात आला. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे नवी दिल्लीत होते. काँग्रेसमध्ये यापूर्वी राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी मराठेतर नेत्यांना संधी देण्यात आली होती. यामुळे देशमुख यांच्या निधनाने रिक्त असलेल्या जागेवर मराठा उमेदवारच द्यावा, असा पक्षात मतप्रवाह होता. त्यातच मराठवाडय़ात राष्ट्रवादीने जोर लावल्याने मराठवाडय़ालाच ही जागा देण्याबाबत काँग्रेसमध्ये विचार झाला. परिणामी मराठवाडा, मराठा आणि महिला हे तीन घटक रजनी पाटील यांच्यासाठी फायदेशीर ठरले. काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी असलेले संबंध त्यासाठी त्यांना फायदेशीर ठरले. बीडमध्ये काँग्रेसची पार वाताहात झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींमध्ये संपूर्ण जिल्ह्य़ातून काँग्रेसचे केवळ दोन सदस्य निवडून आले आहेत. पाटील यांना संधी दिल्याने बीडमध्ये काँग्रेसची संघटना वाढेल, याबाबत मात्र कार्यकर्त्यांमधून साशंकता व्यक्त केली जात आहे. कारण पाटील यांचा जिल्ह्य़ातील संपर्कच कमी झाला आहे.
राज्यसभेकरिता राज्याबाहेरील नेत्याला उमेदवारी देण्याचे पक्षात घाटत होते. पण राजीव शुक्ला यांच्यापाठोपाठ आणखी एक पार्सल राज्यातून पाठविण्यास मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेत्यांनी विरोध केला होता. यापूर्वी मोहन प्रकाश आणि माणिकराव ठाकरे या द्वयीच्या शिफारसीनुसार राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत तिकीटांचे वाटप झाले होते. यंदा मात्र राज्याचे प्रभारी आणि प्रदेशाध्यक्षाने सुचविलेल्या नावावर शिक्कामोर्तब झाले नाही.
यूपीए-१ मध्ये केंद्रीय समाजकल्याण बोर्डाचे अध्यक्षपद याशिवाय महिला विकास आर्थिक मंडळाचे अध्यक्षपद तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपद रजनी पाटील यांनी भूषविले आहे. १९९६ मध्ये भाजपच्या वतीने त्या बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या होत्या. सोनिया गांधी १९९८ मध्ये राजकारणात सक्रिय होताच पाटील या काँग्रेसच्या तंबूत परतल्या. त्यांचे पती अशोक पाटील हे राज्यमंत्री होते. राज्याच्या राजकारणात शंकरराव चव्हाण व शिवराज पाटील यांच्या निकटवर्तीयांमध्ये पाटील कुटुंबिय ओळखले जाते.
निवडणूक बिनविरोध ?
यापूर्वी राष्ट्रवादीने शिवसेना-भाजपच्या मदतीने अपक्षाला निवडून दिले होते. यंदा मात्र राष्ट्रवादी विरोधात जाण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात जाणार नसल्यास भाजप-शिवसेना हे विरोधक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाहीत. राष्ट्रवादीने वेगळे पाऊल टाकल्यास काँग्रेसची गोची होऊ शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा