राज्यसभेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता विरोधी पक्षाने उमेदवार उभा करण्याचे टाळल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील यांची बिनविरोध निवड होणार हे निश्चित झाले. औपचारिक घोषणा अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदतीनंतर म्हणजे शनिवारी करण्यात येईल.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाटील यांच्यासह अन्य एकाने अर्ज दाखल केला असला तरी त्यावर आमदारांच्या सूचक-अनुमोदक म्हणून स्वाक्षऱ्या नसल्याने हा अर्ज छाननीत बाद होईल. यामुळे रजनी पाटील यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. विलासराव देशमुख यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक होत असल्याने विरोधकांनी ती बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विरोधकांना केले होते.
आघाडी आणि अपक्षांचे संख्याबळ १७०च्या आसपास असल्याने विरोधकही उमेदवार उभा करण्याबाबत फारसे गंभीर नव्हते.
यापूर्वी राष्ट्रवादीने काँग्रेसवर कुरघोडी करण्यासाठी विरोधकांची मदत घेतली होती. यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस कोणती भूमिका घेते याकडे काँग्रेस नेत्यांचे लक्ष लागले होते. त्यातच शरद पवार आणि अन्य नेत्यांनी गेल्या तीन-चार दिवसांपासून काँग्रेसच्या विरोधात सूर लावल्याने काँग्रेसच्या गोटात काहीशी धाकधूक होती. पण मुख्यमंत्री चव्हाण यांनी पवार यांच्याशी चर्चा करून पाठिंब्याबाबत आश्वासन मिळविले होते.
राष्ट्रवादीने काही गडबड केल्यास मदत करण्याची विरोधकांची भूमिका होती. तसे काही न झाल्याने काँग्रेसच्या पाटील यांच्या निवडीत काही अडथळे आले नाहीत.

Story img Loader