मुंबईत रविवारी व सोमवारी (७, ८ जुलै) सलग दोन दिवस मुसळधार पाऊस पडला. सर्वसामान्य मुंबईकरांना या पावसाचा मोठा फटका बसलाच. मात्र आमदार आणि मंत्रीही त्यातून सुटले नाहीत. विधानसभेच्या अधिवेशनासाठी मुंबईकडे येत असलेले अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आणि मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांना रेल्वे रुळांवरून चालत जावं लागलं. सकाळी पावणेदहाच्या दरम्यान या दोघांनीही चालत प्रवास सुरू केला. त्यानंतर पुढे उभी असलेली रेल्वे गाठली आणि त्यानंतर ते अधिवेशनाला पोहोचले. सामान्य नागरिकांप्रमाणेच मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांना पावसाचा फटका बसला.
मंत्री अनिल पाटील यांच्यासह अनेक आमदार रेल्वेने मुंबईला येत होते. मात्र ते ज्या एक्सप्रेसने ते मुंबईच्या दिशेने प्रवास करत होते, ती एक्सप्रेस कुर्ला स्थानकाजवळ अडकल्याने इतर प्रवाशांप्रमाणे मंत्री व आमदार रेल्वेतून खाली उतरले आणि रेल्वे रूळावरून चालत मुंबईच्या दिशेने निघाले. हे चित्र पाहून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह विरोधी पक्षांमधील नेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांनीदेखील सरकारला टोला लगावला आहे.
मनसेने राजू पाटील यांचा एक व्हिडीओ एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. यामध्ये म्हटलं आहे. “बरं झालं एका अर्थाने आमदारांना पण रुळावरून चालत जावं लागलं. गेली अनेक वर्षे कल्याण-डोंबिवली ते ठाणे रेल्वेला समांतर रस्ता व्हावा अशी मागणी आहे. गेली ४ वर्षे मी स्वतः आमदार म्हणून या मागणीचा पाठपुरावा करत आहे. आता तरी सरकारला जाग यायला हवी. किती वर्षे लोकांचे पावसाळ्यात रेल्वे बंद पडल्यामुळे हाल होणार? आमच्या पक्षाची तर जुनी मागणी आहे की महाराष्ट्राला स्वतःचं स्वतंत्र रेल्वेबोर्ड असावं.”
हे ही वाचा >> मुंबई : दुय्यम अभियंत्यांनी अधिक सक्रियपणे खड्डे शोधून भरावेत, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे आदेश
दरम्यान, आमदारांची ही स्थिती पाहून विजय वडेट्टीवार म्हणाले, “दररोज सकाळी उठल्यानंतर आपल्याकडे किती आणि कुठल्या मार्गाने पैसे येतील? याचा विचार करून वेगवेगळ्या फायलींवर नेते आणि अधिकारी सह्या करतात. हाच धंदा डोळ्यासमोर ठेवून मुंबईतील प्रशासन आणि राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार काम करतंय. त्यामुळे मुंबईची ही अवस्था होण्याला राज्यातील सत्ताधारी आणि मुंबईचं प्रशासन जबाबदार आहे. या लोकांमुळेच मुंबईची दुरवस्था झाली आहे.”