लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई: राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज भरले. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांनी तर काँग्रेस पक्षाने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने प्रफुल पटेल यांनी तर एका अपक्षाने अर्ज भरला आहे. उद्या छाननीत अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध होणार आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर चव्हाण यांना भाजपने पहिल्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे. भाजपने कोथरूडच्या माजी आमदार राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहे.
हेही वाचा >>> ‘वाढवण’चे याच महिन्यात भूमीपूजन देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, केंद्रीय पर्यावरण खात्याची मंजुरी
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे त्यांचे राज्यसभा उमेदवारी देऊन पुर्नवसन केले आहे. तर भाजपने तिसरा उमेदवार डॉ. अजित गोपछडे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात. विधान परिषदेच्या जून २०२२ च्या निवडणूकीत पराभूत झालेले माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. काँग्रेसने दलित चेहरा दिला आहे.
राज्यसभेसाठी अजित पवार गटाकडून प्रफुल पटेल यांनी अर्ज दाखल केला. यावेळी सुनील तटकरे उपस्थित होते. तर भाजपकडून अशोक चव्हाण आणि शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी अर्ज दाखल केला.
काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. भाजपकडून अजित गोपछडे आणि मेधा कुलकर्णी यांनी अर्ज दाखल केला.
प्रफुल पटेल सर्वात श्रीमंत
● प्रफुल पटेल हे श्रीमंत उमेदवार असून मालमत्ता ४८३ कोटी आहे.
● अशोक चव्हाण यांची मालमत्ता १६ कोटी असून स्थावर मालमत्ता ५१ कोटी ६५ लाख इतकी आहे.
● मेधा कुलकर्णी यांच्याकडे २ कोटी ४८ लाखांची स्थावर संपत्ती असून त्यांची जंगम मालमत्ता २ कोटी ४३ लाख रूपयांची आहे.
● डॉ. अजित गोपछडे यांच्याकडे १ कोटी ८८ लाख मुल्याची स्थावर मालमत्ता असून ३ कोटी ४१ लाख रूपयांची जंगम संपत्ती आहे.
● मिलिंद देवरा यांच्याकडे २३ कोटी रूपयांची मालमत्ता असून ते व त्यांच्या पत्नीकडे ११४ कोटी इतक्या मुल्याची जंगम मालमत्ता आहे.
● चंद्रकांत हंडोरे यांची मालमत्ता १ कोटी ६८ लाख रूपये आहे.