राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसत आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता, त्यामळे सकाळपासूनच घडामोडी सुरू होत्या. सहाव्या जागेसाठी भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवार लढत होणार आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आज महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या निवास्थानी भेटीसाठी गेले होते. मात्र चर्चा निष्फळ ठरल्याने आता राज्यसभा निवडणूक होणार असल्याचे निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी उपस्थितीत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली, यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

Rajya Sabha election : आता वेळ सुरु झाली आहे; आमचा सहावा उमेदवार देखील निवडून येणार – संजय राऊत

संजय राऊत म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमच्या महाविकास आघाडीचे सर्वच नेते बैठकीला होते. आम्ही चर्चा केली, राज्यसभा निवडणुकीसोबतच अन्य देखील काही विषय आहेत. मला असं वाटतं की निवडणूक होतेय, आम्ही ती निवडणूक स्वीकारलेली आहे. या निमित्त आम्हाला परत एक संधी मिळेल आमचं बळ दाखवायची. खरं म्हणजे आम्हाला ते दाखवायची इच्छा नव्हती. वाटलं होत सगळं सहज होऊन जाईल, पण आता विरोधी पक्षाला असं वाटतय ही निवडणूक व्हावी. पण एक लक्षात घ्या, निकाल लागल्यावर त्यांना पश्चाताप होईल.”

घोडेबाजार अजिबात होणार नाही, ज्यांना करायचाय त्यांनी करावा –

तसेच, “या क्षणी मी इतकच सांगेन की महाविकास आघाडीचे चारही उमेदवार अगदी व्यवस्थित जिंकून येतील. कोणीही चिंता करू नये आणि अतिशहाणपणा करू नये. संजय पवार हे देखील अगदी पहिल्या फेरीत निवडून जातील. मी दाव्याने सांगतोय विरोधी पक्षाने आमच्यावर ही निवडणूक लादली आहे, मात्र त्यांना पश्चाताप होणार. घोडेबाजार अजिबात होणार नाही, ज्यांना करायचाय त्यांनी करावा. आमचा आमच्या लोकांवर संपूर्व विश्वास आहे. मात्र जे काही नियोजन करावे लागते ते वेळ आल्यावर आम्ही करू. महाविकास आघाडीकडचं संपूर्ण बहुमत पाहता, आमचे सर्व उमेदवार सहजपणे जिंकतील.” असं यावेळी संजय राऊत यांनी बोलून दाखवलं.

जे करायचं ते करून घ्या विजय तर आमचाच –

याचबरोबर “त्यांचे घोडे त्यांचा बाजार आम्हाला बाजारात उभा राहायची गरज नाही. केंद्रीय यंत्रणाचा दबाव असतोच, त्यांचा वापर काहीजण करू इच्छितात, काहीजण पैशांचा वापर करू इच्छितात मात्र जे करायचं ते करून घ्या विजय तर आमचाच आहे.” असा विश्वास देखील संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

Story img Loader