सेवाज्येष्ठता डावलून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारीया यांची नियुक्ती केल्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे. महासंचालकपदी (गृहरक्षक दल) बढती मिळालेले अहमद जावेद महिनाभर रजेवर गेले आहेत तर आणखी एक महासंचालक के. पी. रघुवंशी हेही आपल्याला डावलण्यात आल्याचा सूर आळवत आहेत. नियुक्त्यांवरून इतक्या मोठय़ा प्रमाणावर प्रथमच नाराजी व्यक्त होत आहे.
जावेद आणि रघुवंशी यांना महासंचालकपदी बढती मिळाल्याने विजय कांबळे सेवाज्येष्ठ होते. तरीही मारीयांच्या नियुक्तीचे समर्थन करताना गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी गुणवत्तेचा मुद्दा उपस्थित केला. हे जर खरे असेल तर मग आपणच मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी योग्य व लायक होतो, असा सूर रघुवंशी यांनी काही निकटवर्तीयांकडे आळवला आहे. आपण तर १९९२ मध्ये दंगलीच्या वेळी नेमलेल्या विशेष तपास पथकात होतो. तेथे कुणी जायला तयार नव्हते. परंतु आपण ते पद स्वीकारले. इतकेच नव्हे तर राज्यात दहशतवादविरोधी स्वतंत्र विभाग नेमण्यात आला तेव्हा त्याच्या प्रमुखपदी जाण्यास कुणी तयार नव्हते. परंतु आपण ते पद स्वीकारले. इतकेच नव्हे तर तेथे कामही करून दाखविले. ठाण्याचे आयुक्तपद तीन वर्षे यशस्वीपणे सांभाळले.
याशिवाय महासंचालक कार्यालयाने अरुप पटनाईक यांच्यासाठी निर्माण केलेले महासंचालक पद अतिरिक्त महासंचालक करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. तो प्रस्ताव राज्य शासनाने स्वीकारला असता तर राज्यात महासंचालकाचे एकच पद रिक्त राहिले असते. डॉ. सत्यपाल सिंग यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त असलेल्या महासंचालक पदावर जावेद यांचा हक्क होता. मग आपण सर्वात ज्येष्ठ अतिरिक्त महासंचालक ठरलो असतो. ज्येष्ठता आणि गुणवत्तेनुसार आपण लायक होतो. मग मुंबई पोलीस आयुक्तपदासाठी आपला विचार का करण्यात आला नाही, असे प्रतिपादन रघुवंशी यांनी निकटवर्तीयांकडे केले आहे.
गेल्या ११ महिन्यांतील बदलीनाटय़ पाहता शासनाच्या मनात काही वेगळेच होते आणि त्यामुळे त्यांनी सर्वच वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांवर गुणवत्ता असतानाही अपमान केला, असे मतही त्यांनी व्यक्त केल्याचे कळते. रघुवंशी प्रचंड नाराज असून तेही सेवेचा त्याग करण्याच्या मनस्थितीत असल्याचे कळते. तेही एका राजकीय पक्षाच्या वाटेवर असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. रघुवंशी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. लघुसंदेशालाही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
ज्येष्ठता, गुणवत्तेनुसार माझ्यावरच खरा अन्याय!
सेवाज्येष्ठता डावलून मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राकेश मारीया यांची नियुक्ती केल्यामुळे वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेली नाराजी अद्याप कायम असल्याचे दिसून येत आहे.
First published on: 20-02-2014 at 02:59 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rakesh maria appointment as mumbai cop is injustice kp raghuvanshi