ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतल्याप्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण मागविले असतानाच, मारिया यांनी मोदी भेटीबाबत आपल्याला काहीच माहिती दिली नव्हती, असे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्याने मारिया यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. काँग्रेसने या प्रकरणातून अंग काढून घेत मोदी प्रकरण चिकटणार नाही, अशी खबरदारी घेतली आहे.
ललित मोदी प्रकरणात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचे नाव जोडले गेल्यानंतर काँग्रेसने भाजपला लक्ष्य केले आहे.
हा वाद सुरू असतानाच मुंबईचे पोलीस आयुक्त मारिया यांनी लंडनमध्ये मोदी यांची भेट घेतल्याचे छायाचित्रच प्रसिद्ध झाले. ही भेट झाली तेव्हा राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेत होते, तसेच या भेटीची आपण सरकारला माहिती दिली होती, असा दावा मारिया यांनी केला आहे. काँग्रेसवर टीकेसाठी भाजप याचा वापर करेल हे लक्षात आल्याने काँग्रेसने आधीच या वादापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला आहे.
मारिया यांनी लंडनमध्ये मोदी यांची भेट घेतली असल्यास आपल्याला काही माहिती नाही. तसेच या भेटीची माहिती त्यांनी आपल्याला दिली नव्हती, असे सांगत, या प्रकरणाशी काँग्रेसचा संबंध नाही असेच पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. मारिया यांनी आपण या भेटीची माहिती तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना दिली होती हे सांगितल्याने या प्रकरणात राष्ट्रवादीबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे सरचिटणीस डी. पी. त्रिपाठी यांनी, मारिया यांच्या मोदी भेटीचे समर्थन केले.
मारिया यांचे भवितव्य अंधारात
राकेश मारिया यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून बदली केली जाईल, अशी चर्चा आहे. पण फक्त मारिया यांची बदली झाल्यास वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. कारण सुषमा स्वराज आणि वसुंधरा राजे यांची भाजपने पाठराखण केली आहे. मारिया यांची सरकारला बदली करायची असल्यास हे निमित्त ठरू शकते. दरम्यान  मारिया यांनी सोमवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भेटीबाबत स्पष्टीकरण
सरकारच्या नोटिशीनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सोमवारी सायंकाळी अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) के. पी. बक्षी यांच्याकडे आपला खुलासा सादर केला. एका वकिलाच्या रदबदलीवरून आपण ललित मोदी यांची लंडनमध्ये भेट घेतली होती. मोदी यांनी जीविताला धोका असल्याची माहिती या भेटीत दिली होती. तेव्हा मुंबईत तक्रार दाखल करण्याची सूचना आपण त्यांना केली होती, असे मारिया यांनी खुलाशात म्हटल्याचे समजते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा