राज्यपाल भगतसिंग कोश्यारींसह भाजपा नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानांनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या विरोधात आज महाविकास आघाडीकडून महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, या मोर्च्यावरून भाजपा नेते राम कदम यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर खोचक टीका केली आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरे यांनाही लक्ष केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – महाविकास आघाडीचा मुंबईत ‘महामोर्चा’; कुठून निघणार मोर्चा, कुठे होणार सभा, कोण होणार सहभागी? वाचा सविस्तर

काय म्हणाले राम कदम?

“सोमवारपासून नागपूरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. आजपर्यंतचा इतिहास बघितला, तर विरोधी पक्ष असो किंवा कोणतीही संघटना असो, त्यांनी जिथे अधिवेशन आहे, तिथेच मोर्चा काढला आहे. मात्र, महाविकास आघाडी आता केवळ काही जिल्ह्यांपूरती शिल्लक राहिली आहे. त्यामुळे कदाचित नागपूरमध्ये भाड्याची गर्दी जमणार की नाही, ही शंका असल्यानेच हा मोर्चा नागपूरऐवजी मुंबईत मोर्चा काढण्यात येतोय की काय?” अशी खोचक टीका राम कदम यांनी केली आहे.

“एकनाथ शिंदेंना बाळासाहेबांचा आशीर्वाद”

“बाळासाहेब ठाकरे यांचे संपूर्ण आयुष्य काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधात लढण्यात गेले. मात्र त्याच काँग्रेस राष्ट्रवादीच्या मागे आज त्यांचा मुलगा आणि नातू फरफटत चालले आहेत. त्यांना काय वाटत असेल? त्यामुळेच बाळासाहेबांचा विचार पुढे नेणाऱ्या एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब आशीर्वाद देत आहेत”, असेही ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ram kadam criticized mahavikas aghadi uddhav thackeray on mumbai mahamorcha spb