मुंबई : राम आणि सीता देशातील सर्व नागरिकांचे दैवत आहेत. ते केवळ हिंदूंचा वारसा नसून, देशातील प्रत्येक व्यक्तीची संपत्ती असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे शिवाजी पार्क येथे आयोजित दीपोत्सवाच्या उद्घाटन प्रंसगी अख्तर बोलत होते.
हेही वाचा >>> भाजपने सरकारचा पाठिंबा काढावा ! आदित्य ठाकरे यांचा सल्ला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह जेष्ठ पटकथाकार सलीम खान, अभिनेता रितेश देशमुख, आशुतोष गोवारीकर, शर्मिला ठाकरे, मनविसे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यासह मनसे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘‘कार्यक्रमाला आपल्याला आमंत्रित केल्याबद्दल काही लोकांना आश्चर्य वाटले असेल. राज ठाकरेंना सलीम-जावेदशिवाय दुसरे कोणी मिळाले नाही का, असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. स्वत:ला नास्तिक समजणारे जावेद अख्तर या मंचावर कसे असेही अनेकांना वाटले असेल. पण, राज ठाकरे हे आमचे परममित्र असून, त्यांनी शत्रूला आमंत्रण दिले तरी तो नकार देणार नाही. आम्ही तर मित्र आहोत’’, असे अख्तर यांनी यावेळी नमूद केले. ‘‘लहानपणी श्रीमंत लोक ‘गुड मॉर्निग’ म्हणताना पाहत होतो. पण रस्त्यावरून जाणारा सामान्य माणूस ‘जय सियाराम’ म्हणायचा. त्यामुळे सीता आणि राम यांचा वेगळा विचार करणं हे पाप आहे. सियाराम हा शब्द प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहे. सिया आणि राम यांना फक्त एकानेच वेगळं केले होते. त्याचे नाव रावण. त्यामुळे त्यांना जो वेगळे करेल तो रावण असेल. म्हणून तुम्ही ‘जय सियाराम’च म्हणा’’, असे आवाहन त्यांनी केले.