लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : घाटकोपरमधील माता रमाईबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकासाच्या कामाला अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाऐ वेग दिला आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाकडून सहा महिन्यांत १६ हजार झोपड्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण आणि पात्रता निश्चिती पूर्ण करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील ४०५३ पैकी ३२०० रहिवाशांना घरभाड्यापोटीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. आतापर्यंत २५०० झोपड्या रिकाम्या करून भूखंड मोकळा करून देण्यात आला आहे. आता उर्वरित झोपड्या हटवून पहिल्या टप्प्यातील भूखंड मे महिन्याअखेरपर्यंत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ताब्यात देण्याचे झोपु प्राधिकरणाचे नियोजन आहे.
एमएमआरडीए पूर्वमूक्त मार्गाचा घाटकोपर – ठाण्यादरम्यान विस्तार करीत आहे. या प्रकल्पात माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील झोपड्या बाधित होत आहेत. त्यामुळे संपूर्ण रमाबाई नगर आणि कामराज नगरमधील १६ हजार झोपड्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए संयुक्त भागीदारी तत्त्वावर हा प्रकल्प राबवित आहे.
दरम्यान, १६ हजार ५७५ झोपड्यांपैकी प्रत्यक्षात १४ हजार ४५४ झोपड्यांचेच पुनर्वसन संयुक्त भागीदारी तत्वावर करण्यात येणार आहे. झोपड्यांचे सर्वेक्षण, पात्रता निश्चिती, झोपड्यांचे पाडकाम आणि भूखंड मोकळा करून देण्याची जबाबदारी झोपु प्राधिकरणावर आहे. पुनर्वसित इमारतींचे बांधकाम करून रहिवाशांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. त्यानुसार या दोन्ही यंत्रणांकडून पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात एन १९ भूखंडावर बांधकाम केले जाणार आहे.
१६ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण
सर्वेक्षण, पात्रता निश्चिती आणि भूखंड मोकळा करण्याचे काम वेगाने व्हावे यासाठी झोपु प्राधिकरणाकडून १० सक्षम प्राधिकरांची (अधिकारी) नियुक्ती करण्यात आली आहे. तर रहिवाशांची सुसंवाद साधून त्यांचे म्हणणे जाणून घेत पात्रता निश्चिती केली जात असल्याने केवळ सहा महिन्यांच्या कालावधीतच १६ हजार झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आल्याचे झोपु प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात ‘एन १९’ भूखंडावर ४०५३ झोपड्या असून आतापर्यंत यापैकी ३५१९ झोपडीधारकांबरोबर करार करण्यात आला आहे. ३५१९ पैकी ९३२ झोपड्या पूर्वमूक्त मार्ग प्रकल्पात थेट बाधित होत आहेत. त्याचवेळी आतापर्यंत ४०५३ पैकी ३७६० झोपडीधारकांचा घरभाड्यापोटीचा धनादेश तयार असून यापैकी ३२०० झोपडीधारकांना धनादेशाचे वाटप करण्यात आल्याचेही झोपु प्राधिकरणाकडून स्पष्ट करण्यात आले.
लवकरच कंत्राटदाराची नियुक्ती
आता पहिल्या टप्प्यातील उर्वरित झोपडीधारकांना धनादेश वाटप आणि करार करून झोपड्या रिकाम्या करुन घेण्यात येणार आहेत. मे महिन्याअखेरपर्यंत पहिल्या टप्प्यातील भूखंड मोकळा करून एमएमआरडीएकडे वर्ग करण्याचे नियोजन असल्याचेही झोपु प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. भूखंड ताब्यात आल्यानंतर एमएमआरडीएकडून पहिल्या टप्प्यातील बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यात येणार असून त्यासाठी निविदा काढल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यातच माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरच्या पुनर्विकासास सुरुवात होण्याची शक्यता आहे.