रामदास आठवले यांच्या सुरक्षा व्यवस्थेत अचानकपणे कपात केल्याने आठवले संतप्त झाले आहेत. आघाडी सरकारने, विशेषत: गृह खाते असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्यावर राजकीय सूड उगविण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.
रामदास आठवले यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. परंतु बुधवारी ते नाशिकच्या दौऱ्यावर निघाले असता ऐनवेळी त्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आल्याचे पोलिसांकडून कळविण्यात आले. त्यामुळे आठवले आणि त्यांचे कार्यकर्तेही संतप्त झाले.
आठवले यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची सुरक्षा व्यवस्था कमी केल्याबद्दल आघाडी सरकारचा निषेध केला. आपण राज्यभर जनतेत फिरत असतो, अलीकडे आपल्या सभांना होणारी गर्दी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या डोळ्यात खुपत आहे. माझे खच्चीकरण करण्यासाठी आघाडी सरकारने सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप त्यांनी केला. आपली सुरक्षा व्यवस्था पूर्ववत करावी अशी आपल्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील व पोलिस आयुक्तांकडे मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा