लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : समाजात एकता निर्माण करायची असेल तर आंतरजातीय विवाह करणे आवश्यक आहे. मीही आंतरजातीय विवाह केला आहे. त्यामुळे आंतरजातीय विवाह कसा करायचा हे जाणून घ्यायचे असेल तर माझ्याकडे या, मी मदत करेन’, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रविवारी विद्यार्थ्यांना सांगितले.
‘राष्ट्रीय संविधान दिन’ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘द प्रॉब्लेम ऑफ रुपी’ या अत्यंत महत्त्वपूर्ण ग्रंथाच्या शताब्दी सोहळ्याच्या निमित्ताने मुंबई विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, लंडन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रॉब्लेम ऑफ रुपीः मूळ आणि त्याचे निराकरण’ या विषयावर रविवार, २६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या फोर्ट संकुलातील सर कावसजी जहांगीर दीक्षान्त सभागृहात आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रामदास आठवले यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांशी संवाद साधला.
आणखी वाचा-“सोनिया गांधींनी चूक केली, मनोज जरांगेंनी ती चूक…”; सल्ला देत प्रकाश आंबेडकर स्पष्टच म्हणाले…
‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेले संविधान बदलण्याची चर्चा बऱ्याचदा होत असते. पण या देशाचे संविधान बदलण्याची हिंमत कोणामध्येही नाही. जे सरकार संविधान बदलणार आहे, मी त्या सरकारमध्ये आहे. मी तुम्हाला मुंबई विद्यापीठातून आश्वासन देतो की संविधानाला अजिबात हात लागणार नाही. जर संविधानाला कोणी हात लावला तर हा समाज अत्यंत भयंकर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज त्यांच्यासाठी स्वतःचे बलिदान देण्यास तयार आहे’, असेही आठवले म्हणाले.