लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाला तरी जागावाटपाबाबत काहीही चर्चा नाही. राज्यसभेबाबतही काही ठोस आश्वासन मिळत नाही, अशा परिस्थितीत महायुतीत राहून काय फायदा, वेगळा विचार करायला हवा, असा दबाव रिपब्लिकन पक्षातून रामदास आठवले यांच्यावर वाढत आहे. आठवले यांची मात्र सबुरीची भूमिका कायम आहे. वेगळा विचार करण्याची ही वेळ नाही, अशी त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत घातल्याचे सांगण्यात येते.  
शिवसेना-भाजपने दिलेल्या थंड प्रतिसादाच्या पाश्र्वभूमीवर रविवारी रात्री आठवले यांच्या उपस्थितीत मुंबईत प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीला अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, सुमंतराव गायकवाड, गौतम सोनावणे, तानसेन ननावरे, सिद्धार्थ कासारे, सोना कांबळे हजर होते. या वेळी काही पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडून वेगळ्या राजकीय पर्यायाचा विचार करावा, अशी मागणी केली.
मात्र आठवले यांनी आता भूमिका बदलण्याची वेळ निघून गेल्याचे सांगितले. महायुतीतच राहून आगामी निवडणुका लढवायच्या, परिणाम काय होतील त्यानंतर पुढचा निर्णय घेऊ, असा सबुरीचा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना दिल्याचे सांगण्यात येते.

Story img Loader