रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवारी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची भेट टाळल्याने राजकीय र्तवितर्क लढविले जात आहेत. काँग्रेसचे काही नेते आठवले यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. विशेषत: दिल्लीत त्यांनी एका काँग्रेस नेत्याची भेट घेतल्याचे बोलले जाते. परंतु स्वत: आठवले यांनी त्याचा इन्कार केला आहे.
जागा वाटपाची चर्चा त्वरीत सुरू होत नसल्याने वैतागलेल्या आठवले यांनी निर्वाणीची भाषा सुरू केली होती. त्या पाश्र्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार खा. संजय राऊत यांनी मंगळवारी रात्रीच आठवले यांची भेट घेतली. त्या भेटीत शिवसेनेच्या कोटय़ातील लोकसभेची एक जागा देण्याचे त्यांनी मान्य केले. भाजपच्या कोटय़ातून एखाद-दुसरी जागा मिळवावी, असा सल्लाही
त्यांना देण्यात आला. किमान चर्चा तरी सुरू झाली, कोंडी फुटली, त्याबद्दल आरपीआयमधून समधान व्यक्त करण्यात आले.
बुधवारी सायंकाळी गोपीनाथ मुंडे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मातोश्रीवर गेले होते. त्या आधी त्यांनी आठवले यांना दूरध्वनी करुन भेटण्याबाबत कळविले होते. परंतु आठवले यांनी आपण रात्री बँकॉकला निघालो आहोत, परत आल्यानंतर चर्चा करू, असे त्यांना सांगितले. मात्र त्यावेळी आठवले वांद्रे परिसरातच एका खासगी बैठकीत होते आणि त्यानंतर त्यांनी दादरला एका कार्यक्रमालाही हजेरी लावली. त्यामुळे आठवले यांनी मुंडे यांची भेट टाळल्याबद्दल तर्कवितर्क लढविले जात आहेत. गेल्या आठवडय़ात आठवले तीन दिवस दिल्लीत होते. त्यावेळी एका काँग्रेस नेत्याची त्यांनी भेट घेतल्याचे बोलले जाते. मात्र त्यांनी त्याचा इन्कार केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा