आज महागाईचा आगडोंब उसळला आहे. भ्रष्टाचार बोकाळला आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे का’ असे पुन्हा एकदा विचारण्याची वेळ आली आहे, असा टोला रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी गुरुवारी दादर येथे झालेल्या चर्चासत्रात काँग्रेस-राष्ट्रवादीचे नाव न घेता हाणला.
लोकमान्य टिळकांच्या विचारांचे स्वातंत्र्यदिनी पुन:स्मरण व्हावे या उद्देशाने गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टतर्फे दादरच्या राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या चर्चासत्रात ‘लोकमान्य टिळक – दलितांच्या दृष्टीकोनातून’ या विषयावर ते बोलत होते. या चर्चासत्रात ‘लोकमान्य टिळक – परदेशातील नेत्यांच्या दृष्टीकोनातून’ या विषयावर ज्येष्ठ विचारवंत सत्यनारायण साहू यांचे भाषण झाले. लोकमान्यांचे पणतू आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. दीपक टिळक यांचेही यावेळी भाषण झाले.
आठवले म्हणाले की, मसाल्याचा व्यापार करण्याच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतावर अधिराज्य गाजविले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून स्वातंत्र्य चळवळ बळकट करण्याचा टिळकांचा प्रयत्न होता. आरक्षणाबाबत बोलताने ते म्हणाले की, ब्राह्मण समाजालाही आरक्षण द्यावे अशी मागणी आपण केली होती. पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. आम्ही ब्राह्मणांच्या विरोधात नाही. त्यामुळे त्यांनीही दलितांना विरोध करु नये.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी पारतंत्र्यकाळात सर्व स्तरातील जनतेला एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला. तेव्हाच्या आणि आताच्या गणेशोत्सवात जमीन आसमानाचा फरक आहे. सुशिक्षित मंडळी गणेशोत्सवात सहभागी होत नसल्यामुळे काही मंडळींच्या हातात हा उत्सव गेला असून त्याला बीभत्स रुप येऊ लागले आहे. त्यामुळे सुशिक्षितांनी गणेशोत्सवात सहभागी व्हावे आणि हा उत्सव चांगल्या दिशेला न्यावा, असे आवाहन दीपक टिळक यांनी केले.
डॉ. दीपक टिळक पुढे म्हणाले की, उत्सव हा राजकारण आणि समाजाचा आरसा असून त्यातूनच सर्व काही प्रतिबिंबित होत असते. सुशिक्षितांनी गणेशोत्सवाकडे पाठ फिरविल्याने ही अवकळा आली आहे. सुशिक्षितांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि उत्सवाला चांगले रुप मिळवून द्यावे. लोकमान्यांनी समाज एकसंघ करण्यासाठी प्रयत्न केले. पण आज समाज दुभंगण्याचे काम केले जात आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
विदेशी साहित्यिकांनी लोकमान्य टिळकांबद्दल केलेल्या गौरवास्पद विधानांवर सत्यनारायण साहू यांनी यावेळी प्रकाशझोत टाकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा