रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिल्लीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप अशा सर्वपक्षीय नेत्यांसोबत गाठीभेटी अभियान सुरू केल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. मात्र कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आनंद शर्मा यांची इंदू मिल जमीन हस्तांतरणासंदर्भात भेट घेतल्याचे आठवले यांनी सांगितले. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंग यांच्याबरोबर झालेल्या भेटीत मात्र आगामी निवडणुका आणि राज्यसभेच्या खासदारकीबाबत चर्चा झाल्याची माहिती त्यांनी दिली.  
शिवसेना-भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर रामदास आठवले जाहीर सभांमधून काँग्रेस व राष्ट्रवादीवर जोरदार टीका करीत आहेत. दिल्लीत गेले की मात्र हमखास ते दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठी-भेटी घेत असतात. त्यामुळे कधी कधी आरपीआयचे इतर नेते आणि कार्यकर्तेही बुचकळ्यात पडतात. इंदू मिलच्या प्रश्नावर मोर्चा काढण्यासाठी मंगळवारी आठवले दिल्लीत दाखल झाले. मोर्चानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत आपण इंदू मिल जमीन हस्तांतरणाचा कायदा लवकरात लवकर करावा, अशी त्यांना विनंती केल्याचे आठवले म्हणाले. बुधवारी त्यांनी शरद पवार व केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री आनंद शर्मा यांची भेट घेऊन तीच मागणी केली. पुढील अधिवेशनात इंदू मिल जमीन हस्तांतरण विधेयक मांडण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन पवार व शर्मा यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले.  भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह यांचीही आठवले यांनी भेट घेऊन सुमारे तासभर राजकीय चर्चा केली.

Story img Loader