आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागावाटपात योग्य वाटा मिळावा यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवार १ मे पासून राज्यात विभागवार जाहीर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे गल्लीतली सभा असो की दिल्लीतला मेळावा, सेना-भाजपच्या नेत्यांशिवाय आरपीआयचा कार्यक्रमच तडीला जात नाही, या वेळी मात्र केवळ आरपीआयचीच ताकद दाखविण्यासाठी आठवले यांनी जाणीवपूर्वक युतीच्या नेत्यांना टाळल्याचे सांगितले जात आहे.
रामदास आठवले यांचे कायम युत्या-आघाडय़ांचे राजकारण राहिले आहे. १९९० ते २०११ पर्यंत त्यांची काँग्रेस व राष्ट्रवादीबरोबर युती होती. त्यावेळी कोणताही पक्षाचा कार्यक्रम असला की त्याला काँग्रेसच्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना आवर्जून बोलावले जात असे. गेल्या दोन वर्षांपापासून आठवले यांनी शिवसेना-भाजपशी युती केली आहे. त्यावेळपासून अगदी पक्षाचा साधा मेळावा असो किंवा पक्षांर्तगत चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिर असो शिवसेना-भाजपच्या नेत्यांना खास करुन बोलावले जात असे. २०११ मध्ये नागपूरमध्ये भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आरपीआयचे अधिवेशन पार पडले होते. तर ऑक्टोबर २०१२ मध्ये मुंबईत घेतलेल्या अधिवेशनाला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे व भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांना निमंत्रित करण्यात आले होते. उद्यापासून राज्यातील विविध भागांमध्ये आयोजित केलेल्या जाहीर सभांपासून मात्र आरपीआयने सेना-भाजपच्या नेत्यांना दूर ठेवले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाची चर्चा लवकर सुरु करा असे गेल्याच आठवडय़ात त्यांनी सेना-भाजप नेतृत्वाला आवाहन केले आहे. महायुतीत मनसेला घेतले तर आपण फार दखलपात्र राहणार नाही, अशी भीती आरपाआयच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळेच जागावाटपाच्या वाटाघाटी लवकर सुरू करा आणि आरपीआयला सन्मानाची वागणूक द्या, असे आवाहन आठवले यांना करावे लागले. महायुतीत आपली योग्य ती दखल घेतली जावी, यासाठी पक्षाची ताकद दाखविण्याची आठवले यांनी ठरविले आहे. त्यानुसार बुधवारी पुण्यात बी. जी. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात परिवर्तन सभा होणार आहे. त्यानंतर ११ मेला नाशिक, १९ ला बीड, २६ ला मुंबई आणि २ जूनला सोलापूरला जाहीर सभा होणार आहेत. या सभांना किमान ५० हजार लोक जमवून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची आठवले यांनी तयारी केली आहे.
सेना-भाजपच्या नेत्यांना टाळून आठवलेंचे शक्तिप्रदर्शन
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या जागावाटपात योग्य वाटा मिळावा यासाठी रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी बुधवार १ मे पासून राज्यात विभागवार जाहीर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. विशेष म्हणजे गल्लीतली सभा असो की दिल्लीतला मेळावा, सेना-भाजपच्या नेत्यांशिवाय आरपीआयचा कार्यक्रमच तडीला जात नाही,
First published on: 01-05-2013 at 04:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale playing power card to demand more seat in upcoming election