नवी मुंबई व औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकांमध्ये खासदार रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाब्लिकन पक्षाला एकाही जागेवर यश मिळाले नाही. उलट बहुजन समाज पक्षाने औरंगाबादमध्ये चार जागा पटकावल्या. डेमोक्रॅटिक रिपब्लिकन गटाचेही दोन उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात आपलाच गट प्रभावी असल्याचा दावा करणाऱ्या आठवले यांचा पक्ष या निवडणुकीत निष्प्रभ ठरला आहे.
नवी मुंबईत भाजप-शिवसेनेने महायुतीतील आठवले गटाला दूरच ठेवले होते. त्यामुळे रिपाइंने स्वतंत्रपणे १२ उमेदवार उभे केले होते व दोन अपक्षांना पाठिंबा दिला होता; परंतु रिपाइंचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. दोन अपक्ष निवडून आले, तरी रिपाइंप्रमाणे इतर गटांनाही त्याचे श्रेय जाते. भाजपबरोबर युती करण्याचा आमचा शेवटपर्यंत प्रयत्न सुरूहोता, परंतु त्याला यश मिळाले नाही, असे पक्षाचे नेते अविनाश महातेकर यांनी सांगितले. तरीही नवी मुंबईत रिपाइंचे उमेदवार नसलेल्या मतदारसंघांतील रिपाइंच्या मतदारांनी भाजप-शिवसेनालाच समर्थन दिल्याचा दावा त्यांनी केला.
औरंगाबादमध्ये आठवले गटाला युतीने बरोबर घेतले होते; परंतु तीन जागांवर शिवसेनेने धनुष्यबाण चिन्हावर व भाजपने दोन प्रभागांत कमळ चिन्हावर रिपाइंचे उमेदवार उभे केले होते, तर आठ प्रभागांमध्ये रिपाइंचे स्वतंत्र उमेदवार लढतीत होते; परंतु सर्व जागांवर अपयशच मिळाले. मात्र बसपने औरंगाबादमध्ये चार जागा जिंकून बाजी मारली आहे. बसपचे नेते डॉ. सुरेश माने यांच्या संघटनात्मक बांधणीचे हे यश मानले जात आहे. दिवंगत टी.एम. कांबळे संस्थापित डेमोक्रॅटिक रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या आहेत.

‘राज्यात युतीचे पडद्यामागून साटेलोटे’
राज्यात शिवसेना-भाजप युती आणि एमआयएमचे पडद्याआडून साटेलोटे असून, उभयतांनी औरंगाबादमध्ये परस्परांना मदत होईल अशी  खेळी केल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी  केला. पालिकांच्या निवडणुकीत भाजपची पीछेहाट झाल्याने स्पष्ट होते, अशी टीकाही त्यांनी केली.  औरंगाबादमध्ये एमआयएमच्या वतीने हिंदूबहुल प्रभागांमध्ये आक्रमकपणे प्रचार करण्यात आला. त्याची प्रतिक्रिया उमटली, तर मुस्लिमांचा मतांचा अधिकार काढून घ्या किंवा प्रचारातून सेनेने एमआयएमला मदत होईल, अशी भूमिका घेतली होती असा आरोप केला

सदस्य नोंदणीपेक्षा मते कमी
मुख्यमंत्र्यांसह अनेक भाजप नेत्यांनी नवी मुंबई आणि अन्य ठिकाणी सभा घेतल्या व प्रचार केला. तरीही भाजपला चांगले यश मिळू शकले नाही. भाजपचे राज्यात एक कोटी सदस्य झाले आहेत. ज्या महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात निवडणुका झाल्या, तेथे भाजपच्या सदस्यसंख्येच्या निम्मी मतेही भाजपला मिळालेली नाहीत. यावरून सदस्यनोंदणी मोहीम कशा प्रकारे राबविली गेली आहे, याची प्रचीती येत आहे.

नवी मुंबई व बदलापूरमध्ये भाजपची पीछेहाट झाली असली तरी महायुतीला यश मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या निकालांबद्दल आणि भाजपच्या कामगिरीबद्दल अधिक बोलणे मुख्यमंत्र्यांनी टाळले.