रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीच राज्यात मंत्री व्हावे, हा भाजपचा हेका, तर केंद्रातच मंत्रीपद हवे असा आठवलेंचा हट्ट कायम असल्याने   विधान परिषदेच्या उमेदवारीतून रिपाइंला डावलण्यात आले. त्यामुळे आठवले यांच्यासह रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  मुळात आपण राज्यसभेचे खासदार असताना, राज्यातील मंत्रीपदाचा आग्रह धरणे व त्यासाठी रिपाइंला विधान परिषदेची उमेदवारी नाकारणे हा भाजपचा निर्णय चुकीचा आणि आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा आहे, अशी प्रतिक्रिया रामदास आठवले यांनी लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केली.
विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. त्याआधी सोमवारी रात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व आठवले यांची बैठक झाली. त्यात दानवे यांनी आठवले यांना विधान परिषदेची आमदारकी व पुढे लगेच होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री करण्याचा प्रस्ताव दिला. मात्र आठवले यांनी त्याला नकार दिला. त्यामुळे भाजपने रिपाइंला डावलून शिवसेनेचे सुभाष देसाई, शिवसंग्रामचे विनायटक मेटे, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर या मित्र पक्षाच्या नेत्यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली. आठवले नाही तर, मग रिपब्लिकन पक्षाला विधान परिषदेची आमदारकी नाही, या भाजपच्या भूमिकेवर कार्यकर्ते नाराज झाले आहेत.  

Story img Loader