Dasara Melava 2022 latest news: मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘दसरा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यातून माजी मंत्री आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. दरम्यान, त्यांनी एक जुना प्रसंग सांगत उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एकनाथ शिंदे मेले तरी चालतील, असं उद्धव ठाकरे यांचं वास्तव आहे, असं रामदास कदम म्हणाले.
शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात रामदास कदम म्हणाले, “एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छितो. एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. धमकीची बाब कळाल्यानंतर त्यांनी ताबोडतोब एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देण्याचा आदेश जारी केला. शंभूराज देसाई हे त्यावेळी गृहराज्यमंत्री होते.
पण यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता शंभूराज देसाई यांना उद्धव ठाकरेंचा फोन आला. एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा देऊ नका, असं त्यांनी सांगितलं. म्हणजे एकनाथ शिंदे मेले तरी चालतील, नक्षलवाद्यांनी त्यांचा खात्मा केला तरी चालेल, पण त्याला झेड सुरक्षा देऊ नका, हे उद्धव ठाकरेंचं वास्तव आहे, असा गंभीर आरोप रामदास कदमांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचा कोणताही कार्यकर्ता मोठा झालेला उद्धव ठाकरेंना आवडत नाही. एखादा कार्यकर्ता मोठा होतोय, असं वाटलं की, त्याला संपवून टाकायचं, ही उद्धव ठाकरेंची नीति आहे. उद्धव ठाकरेंनी आनंद दिघे यांचाही जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा मागितला होता. ही बाब किती लोकांना माहीत आहे? मी त्या घटनेचा साक्षीदार आहे. दिघेसाहेब माझे मित्र होते, असंही रामदास कदम म्हणाले.