वेदांता कंपनीने आपला प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला स्थलांतर केल्यानंतर विरोधकांकडून शिंदे फडणवीस सरकारवर टीका होते आहे. यावरूनच काल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे गटावर जोरदार टीका केली होती. ‘स्वत:साठी खोके आणि महाराष्ट्राला धोके’, असं हे सरकार असल्याचे त्यांनी म्हटले होते. आदित्य ठाकरेंच्या या टीकेला शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे खोका-खोका करत आहे. मात्र, खोक्याचा विषय मातोश्रीला नवीन नसल्याने त्यांचा जप सुरू आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा – दसरा मेळाव्यावरून रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “उद्धव ठाकरे हे…”
काय म्हणाले रामदास कदम?
“शिंदे भाजपा सरकार सत्तेत येऊन दोन महिने झाले. त्यामुळे वेदांता प्रकल्प शिंदे सरकारच्या चुकीने महाराष्ट्रातून गेला, असं तुम्ही कसं म्हणू शकता? उलट मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी केली आहे. मुळात आदित्य ठाकरेंना याबाबत बोलण्याचा अधिकार नाही. मागचं सरकार आदित्य ठाकरे चालवत होते. त्यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई होते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना बदनाम केल्या पेक्षा त्यांनी सुभाष देसाई यांना याबाबत विचारावं”, असे प्रत्युत्तर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंना दिले आहे.
हेही वाचा – १०० कोटींचं खंडणी प्रकरण : शिंदे सरकारमुळे अनिल देशमुखांच्या अडचणी वाढल्या; CBI ला दिली ‘ती’ परवानगी
“मातोश्रीला खोका हा विषय नवीन नाही”
“आदित्य ठाकरे यांचं सध्या खोका-खोका सुरू आहे. मात्र, मातोश्रीला खोका हा विषय काही नवीन नाही. आम्ही त्याला साक्षीदार आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी भान ठेऊन बोलावं. महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. खोक्याचे राजकारण हे फक्त आमच्या आमदारांना बदनाम करण्यासाठी आहे. त्यामुळे आदित्य ठाकरेंचे आरोप हे बालिशपणाचे लक्षणं आहेत”, असेही ते म्हणाले.