मुंबई : खार येथील एका व्यावसायिकाची ६७ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कमला मिल्स कंपाऊंडचे मालक व बांधकाम व्यावसायिक रमेश गोवानी (६०) यांना अटक केली आहे.
आमीकृपा लँड डेव्हलपर्स ही रिअल इस्टेट कंपनी असलेल्या गोवानी यांनी तक्रारदाराकडून सांताक्रूझ येथे २,२०४ चौरस मीटरचा भूखंड खरेदी केला होता आणि त्याबदल्यात १० सदनिका आणि दुकान देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आश्वासन पूर्ण करण्यात अपयशी ठरले आणि सदनिका इतर व्यक्तीला विकल्याचा आरोप आहे. गोवानी यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
हेही वाचा – वडाळा, ॲन्टॉप हिलमधील ८७ नवीन घरेही आगामी सोडतीत; अत्यल्प गटासाठी घरे
कथित फसवणूक सप्टेंबर २०१३ ते फेब्रुवारी २०१४ दरम्यान घडली. मंगळवारी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा नोंदवत गोवानी यांना अटक केली. पोलीस तक्रारीनुसार, २०१३ मध्ये गोवानी यांनी सुरजीत सिंह अरोरा यांच्याकडून हा भूखंड खरेदी केला होता. त्यांनी जमिनीच्या बदल्यात २० कोटी रुपये आणि १० सदनिका आणि दुकान देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या कंपनीने भूखंडावर बांधलेल्या निवासी इमारतीमध्ये या सदनिका होत्या. गोवानी यांच्या कंपनीने या जमिनीवर एक इमारत बांधली, परंतु दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही.