मुंबई : प्रक्षोभक वक्तव्य आणि सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या जामीन अर्जावरील निर्णय सत्र न्यायालय आता बुधवारी देणार आहे. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरीव निर्णय सत्र न्यायालयाने सोमवारर्यंत राखून ठेवला होता. न्यायालय सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास राणा दाम्पत्याच्या अर्जावर निर्णय देणार होते. नंतर सायंकाळी पाचच्या सुमारास निर्णय देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले. परंतु अन्य प्रकरणांमध्ये व्यस्त असल्याने राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावरील आदेश पूर्ण होऊ शकलेला नाही. त्यामुळे त्यांच्या अर्जावरील निर्णय बुधवारी देण्यात येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी नंतर स्पष्ट केले. त्यामुळे राणा दाम्पत्याला जामीन मिळणार की नाही याचा निर्णय बुधवारी होणार आहे.

वांद्रे न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावल्यावर राणा दाम्पत्याने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र त्यांच्यावर राजद्रोहाचा गंभीर आरोप ठेवण्यात आल्याने राणा दाम्पत्याने हा जामीन अर्ज मागे घेऊन सत्र न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. सरकारवर टीका करणे किंवा मुख्यमंत्र्याच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसाचे पठण करणे हा राजद्रोह होत नाही, असा दावा राणा दाम्पत्याने जामिनाची मागणी करताना केला.