लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या शेवटच्या प्रलंबित खटल्यात शुक्रवारी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला. त्यामुळे, चार वर्षांनी राणा हे तुरुंगातून बाहेर पडणार आहेत. अवंथा रियाल्टीशी संबंधित दाखल केलेल्या गुन्ह्यात राणा यांना विशेष न्यायालयाने हा जामीन मंजूर केला.

दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने (डीएचएफएल) राणा यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या कंपनीला दिलेल्या ६०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या माध्यमातून लाच स्वीकारल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या प्रकणात ८ मार्च २०२० रोजी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राणा यांना अटक केली होती. येस बँकेने दिलेल्या कर्जातील कथित अनियमिततेप्रकरणी राणा यांच्यावर विविध गुन्हे दाखल असून अन्य प्रकरणांत त्यांना जामीन मंजूर झाला आहे. त्यामुळे, उपरोक्त प्रकरणातही राणा यांना जामीन मंजूर झाल्याने ते कारागृहातून बाहेर पडणार आहेत.

आणखी वाचा-मुंबई : हिल रोडवरील बेकायदा विक्रेत्यांना हटवा, उच्च न्यायालयाचे महापालिकेला आदेश

राणा यांना लाच म्हणून नवी दिल्लीतील अवंथा रियल्टीशी संबंधित मालमत्ता बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात मिळाली होती. बँकेने दिलेल्या सवलतींच्या मोबदल्यात ही मालमत्ता राणा यांना देण्यात आली होती, असा सीबीआयचा आरोप आहे. अवंथा रियाल्टीशी संबंधित ईडीने दाखल केलेल्या प्रकरणात, विशेष न्यायालयाने २०२० मध्ये राणा यांना जामीन मंजूर केला होता. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा खटला सुरू करण्यासाठी तपास यंत्रणेने कोणतेही स्वारस्य दाखवलेले नाही. या खटल्याची सुनावणी अद्याप सुरूही झालेली नाही. शिवाय, राणा यांनी तुरुंगात घालवलेला कालावधी लक्षात घेता त्यांना जामीन मंजूर करत असल्याचे विशेष न्यायालयाने म्हटले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rana kapoor gets bail in latest case will be out of jail after four years mumbai print news mrj
Show comments