राज्याच्या औद्योगिक धोरणावरून मंत्रिमंडळ बैठकीत उद्योगमंत्री नारायण राणे यांना घेरण्याच्या राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या प्रयत्नामुळे या दोघांतील कलगीतुरा बुधवारी चांगलाच रंगला. ‘शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योजकांच्या घशात घालण्याचे हे कसले औद्योगिक धोरण’ असा शेरा मारणाऱ्या राष्ट्रवादीच्या आर. आर. पाटील यांना राणे यांनी ‘भाषणाने गरिबी मिटत नाही’, असा टोला मारत प्रत्युत्तर दिले.
मंत्रिमंडळाच्या २ जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत उद्योग धोरणाला छगन भुजबळ, आर. आर. पाटील, जयंत पाटील आदी मंत्र्यांनी जोरदार विरोध करीत राणे यांच्यावर हल्ला चढविला होता. आज पुन्हा राष्ट्रवादीच्या मंत्र्यानी राणे यांना लक्ष्य केले. सेझच्या जमिनीवर घरे बांधणे चुकीचे असून या जमिनी शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी पुन्हा करण्यात आली. दुष्काळी भागात उद्योग यावेत, यासाठी सवलती देण्याची मागणी करण्यात आली. त्यावरून संतापलेल्या राणे यांनी प्रतिहल्ला चढविला. मंत्रिमंडळ बैठकीतील माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली. शेजारील राज्ये उद्योगांसाठी रेड कार्पेट टाकत आहेत, मात्र आपणच धोरणावर टीका करणार असू तर उद्योग कसे येणार असा सवाल करीत राणे यांनी आपला मोर्चा गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे वळविला. भाषणाने गरिबी हटणार नाही. त्यासाठी उद्योग येण्याची गरज आहे. दुष्काळी भागात उद्योग येण्यास आपली हरकत नाही. मात्र तेथे पाण्याची सुविधा आहे का? तसेच अविकसित भागातील उद्योगांना सवलती देण्यासही आपली हरकत नाही. मात्र आर्थिक भार सोसण्याची सरकारची तयारी आहे का असा सवालही त्यांनी केला. तसेच कायदा-सुव्यवस्था आणि गृह विभागाच्या कारभाराचा मुद्दाही उपस्थित केला. त्यावर पाटील यांनीही राणेंवर प्रतिहल्ला करीत बदल्यांच्या कायद्यामुळे साधा पोलीस निरीक्षकही आयुक्तांचे ऐकत नाही, वकील देण्याचे काम आमचे नाही, तुम्हीच सुमार वकील देता, तर आरोपी मोठे वकील उभे करतात. त्यामुळेच गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण कमी असून बदल्यांचे धोरण मंत्रिमंडळासमोर आणण्याची मागणी होत असतानाही ते आणले जात नसल्याचे सांगितले.

Story img Loader