भाजप सरकारच्या विरोधात मालमसाला असताना आरोप झालेल्या मंत्र्यांची कोंडी करण्यात काँग्रेसला पावसाळी अधिवेशनात यश आले नाही, अशी टीका होत असतानाच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपवर गुरुवारी जोरदार हल्ला चढविला. वादग्रस्त चिक्की खरेदीकरिता विरोधी पक्षनेतेपदी असताना एकनाथ खडसे यांनी शिफारस केली होती तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणांचा पाऊस पाडताना जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप करून राणे यांनी यापुढील काळात सरकारच्या विरोधात आक्रमक राहणार असल्याचे स्पष्ट केले.
चिक्की खरेदीतील गैरव्यवहारांचा आरोप फेटाळताना सूर्यकांता संस्थेला काम देण्याचा निर्णय तत्कालीन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी घेतला होता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत निदर्शनास आणून दिले होते. हे आरोप फेटाळून लावताना राणे यांनी, १ सप्टेंबर २०१२ रोजी तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनीच या संस्थेला काम देण्याची शिफारस करणारे पत्र दिले होते, असे सांगत भाजपवरच हे प्रकरण उलटविण्याचा प्रयत्न पत्रकार परिषदेत केला. मुख्यमंत्री फडणवीस आणि खडसे यांच्यात सध्या शीतयुद्ध सुरू असताना राणे यांनी चिक्की खरेदीच्या वादात खडसे यांना ओढले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या, पण त्यातील बरीचशी कामे आघाडी सरकारच्या काळात सुरू झाली होती. त्याचे श्रेय घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न आहे. गोरगरिबांना उपचार मिळावेत म्हणून राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू करण्यात आली व त्याचा राज्यातील लाखो गरजूंनी लाभ घेतला आहे. सत्ताबदल झाला म्हणून या योजनेचे नाव बदलण्याच्या सरकारच्या योजनेवर राणे यांनी टीका केली. राजीव गांधी यांचा त्याग व बलिदान याचा विसर पडता कामा नये, असा सल्ला त्यांनी सरकारला दिला.
मुंबई-नागपूर असा ३० हजार कोटी खर्च करून द्रुतगती मार्ग बांधण्याच्या योजनेवर टीका करताना राणे यांनी, विदर्भातील किती जण वाहनाने मुंबईत येतात, असा सवाल केला. त्यापेक्षा मुंबई-नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्याची मागणी केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा