लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या दणकून झालेल्या पराभवाचे भांडवल करून ‘मुख्यमंत्री हटाओ’चा जोर लावण्याकरिता दिल्लीत गेलेले उद्योगमंत्री नारायण राणे आणि वनमंत्री पतंगराव कदम यांना बुधवारी रित्या हातानेच परतावे लागले. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा दमदार नेता नसल्याने राज्यात नेतृत्वबदल करण्यास नकार देत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या दोन्ही नेत्यांना पुन्हा गप्प बसवले आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज, गुरुवारी होणार असून राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाड यांचा समावेश नक्की आहे. परंतु, काँग्रेसच्या कोटय़ातील तीन जागा आताही रिक्तच ठेवण्यात येणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षाही कमी जागा मिळाल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याची मागणी काँग्रेसमधील काही गटांतून जोर धरू लागली आहे. हाच धागा पकडून पतंगराव कदम आणि नारायण राणे यांनी बुधवारी दिल्ली गाठली. कदम यांनी काँग्रेसचे महाराष्ट्रातील प्रभारी मोहन प्रकाश यांच्यामार्फत तर राणे यांनी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी सोनिया गांधी यांच्या कानावर पोहोचवली. मात्र, सोनियांनी त्यांची मागणी धुडकावून लावली आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची जागा घेवू शकणारा एकही दमदार नेता  नसल्याचे सोनिया गांधी यांचे मत आहे.
दुसरीकडे, गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे. डॉ. विजयकुमार गावित यांची हकालपट्टी करण्यात आल्याने राज्य मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या कोटय़ातील एक जागा रिक्त होती. आव्हाड यांच्या नावाची शिफारस राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आली असून, गुरुवारी सकाळी राजभवनवर त्यांचा शपथविधी पार पडेल. विधान परिषदेची मुदत संपलेल्या फौजिया खान यांना वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात असली तरी हा बेत बारगळलेला दिसतो.
दरम्यान, मंत्रिमंडळातील काँग्रेसच्या कोटय़ातील तीन जागा गेली साडेतीन वर्षे रिक्त आहेत. गुरुवारच्या विस्तारात ही पदे भरली जाण्याचा अंदाज होता. मात्र, सोनिया गांधी यांनीच याला नकार दिला आहे. यासंदर्भात चव्हाण आणि माणिकराव ठाकरे यांनी बुधवारी नवी दिल्लीत सोनिया गांधींशी चर्चाही केली.

Story img Loader