उद्योगमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसमध्ये सध्या फारसे महत्त्व मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या त्यांनी आपले पुत्र नितेश राणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेसलाच खड्डय़ात घालण्याचा ‘उद्योग’ सुरू केला आहे, असा सणसणीत टोला महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. मुंबईतील गुजराती  बांधवांना बाहेर घालविण्याची नितेश राणे यांची भूमिका खपवून घेतली जाणार नाही, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
भाजपच्या निवडणूक प्रचार मोहीमेचे प्रमुख नरेंद्र मोदी यांचे गुणगान गाणाऱ्या आणि गुजरात विकासाचे तुणतुणे वाजविणाऱ्या गुजराथींनी मुंबई सोडून जावे, अशी ‘टिवटिव’ नितेश राणे यांनी ट्विटरवरून केली होती. नितेश राणे हे केवळ स्वाभिमानी संघटनेचे नेते असून वडिलांच्या सल्ल्याशिवाय एवढी वादग्रस्त भूमिका घेणे  शक्यच नाही असे सांगून फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्रीपदावर डोळे ठेवून थकलेल्या राणे यांना सध्या काँग्रेसमध्ये कोणी विचारत नाही त्यामुळेच अस्वस्थ झालेल्या राणे यांचा मूळ स्वभाव उफाळून येऊन आपल्या मुलाच्या माध्यमातून गुजराती बंधवांच्या विरोधात विधान करायला लावले असावे. मुंबईच्या विकासात गुजराती बांधवांचे एक योगदान असून ते महाराष्ट्राशी समरस आहेत. गुजरातने चांगला विकास केला याचे कौतुक ‘मनसे’ करणारे अनेकजण आहेत. नरेंद्र मोदी यांनी गुजरातचा जो विकास केला त्यामुळेच चौथ्यांदा तेथील जनतेने त्यांना निवडून दिले. काँग्रेसला याचे दु:ख असू शकते मात्र मुंबईतील गुजराती बांधवांनी मोदींचे कौतुक केले म्हणून त्यांना मुंबई सोडून जाण्याचा शहाजोगपणा करणारा सल्ला देण्याचा ‘उद्योग’ हा काँग्रेला महाराष्ट्रात खड्डय़ात घालण्यासाठी करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केवळ गुजरातीच नव्हे तर मराठी माणूसही गुजराच्या विकासाचे तेथील चांगल्या कामांचे कौतुक करत असून उद्या मराठीजनांनाही मोदी यांच्या कौतुकासाठी चालते होण्याचे ‘आदेश’ नितेश राणे देणार आहेत का, असा सवालही त्यांनी केला. दुधात ज्याप्रमाणे साखर मिसळते त्याप्रमाणे गुजराथी बांधव महाराष्ट्रात मिसळले असताना भाषिकवादाचे नसते ‘उद्योग’ कोणी करू नयेत असा इशाराही फडणवीस यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा