काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी केलेल्या विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालं आहे. एकीकडे भाजपानं राहुल गांधींना लक्ष्य केलेलं असताना दुसरीकडे सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं आहे. “एका महिलेसाठी जवाहरलाल नेहरूंनी देशाची फाळणी केली”, असं विधान रणजीत सावरकरांनी केल्यामुळे यावरून आता अजून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रणजीत सावरकरांनी शनिवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले रणजीत सावरकर?

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी भारत जोडो यात्रेदरम्यान केलेल्या विधानावरून आधी वाद निर्माण झाला. सावरकरांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती. ते ब्रिटिशांकडून पेन्शन घेत होते, असा दावा राहुल गांधींनी केला होता. यावरून वाद निर्माण झाल्यानंतर ठाकरे गटानं राहुल गांधींच्या विधानाशी आपण सहमत नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, त्याचवेळी भाजपाकडून राहुल गांधींना लक्ष्य केलं जात आहे. या सर्व वादावर बोलताना रणजीत सावरकर यांनी थेट जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी गंभीर दावा केला आहे.

“पंडित जवाहरलाल नेहरूंनी एका बाईसाठी भारताची फाळणी मान्य केली. १२ वर्षे भारताची सर्व गुप्त माहिती ब्रिटिशांना दिली. माझी मागणी आहे की, नेहरू-एडवीना पत्रव्यवहार ब्रिटिशांकडे मागावा आणि ते सर्व जाहीर करावं. त्यानंतरच जनतेला कळेल की, ज्यांना आपण चाचा नेहरू म्हणतो त्या नेत्याने देशाची कशी फसवणूक केली”, असा दावा रणजीत सावरकरांनी केला आहे. यावेळी त्यांनी १९४७ साली घडलेल्या एका घटनेचाही संदर्भ दिला.

एडवीनाचं ब्रिटिश सरकारला पत्र…

“९ मे ते १२ मे १९४७ नेहरू एकटेच शिमलाला गेले. तिथं ते कुटुंबासोबत चार दिवस राहिले. त्याबाबत एडवीनाने ब्रिटिश सरकारला लिहिलेल्या पत्रात लिहिलं आहे की, मी नेहरूंना आपले पाहुणे म्हणून बोलावलं. ते अतीव्यग्र असल्याने ते ‘नर्व्हस ब्रेक डाऊन’च्या दिशेने जात आहेत. त्यांनी चार दिवस माझ्यासोबत घालवले. माझी आणि त्यांची चांगली मैत्री झाली. ही मैत्री खूप दीर्घकाळ टिकेल”, असंही सावरकर म्हणाले. तसेच, नेहरूंना हनीट्रॅप करण्यात आलं होतं, असाही दावा रणजीत सावरकर यांनी केला आहे.

दरम्यान, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज रणजीत सावरकरांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची शिवतीर्थवर जाऊन भेट घेतली. यावेळी नेमकी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली, याविषयी सविस्तर माहिती समोर आलेली नाही. ही सदिच्छा भेट असल्याचं मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगण्यात आलं आहे. मात्र, राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर पुढील कार्यवाहीसंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मनसेकडूनही राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी त्यांच्या शेगावमधील सभेला विरोध करण्यात आला होता. यासाठी केलेल्या आंदोलनादरम्यान काही मनसे नेत्यांना पलिसांनी चिखलीमध्ये ताब्यातही घेतलं होतं. या पार्श्वभूमीवर रणजीत सावरकर आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे.

“नेहरूंनी एका महिलेसाठी भारताची फाळणी केली आणि १२ वर्षे…”, सावरकरांच्या नातवाचे गंभीर आरोप

“राहुल गांधींच्या विरोधात महाराष्ट्रभर निषेधाची आंदोलनं झाली. त्यात सर्वात मोठं आंदोलन मनसेनं केलं. त्यांचे कार्यकर्ते राहुल गांधींच्या शेगावमधील सभेतही गेले. तिथे त्यांनी काळे झेंडे फडकावले. त्यासाठी मी राज ठाकरेंचे आभार माननण्यासाठी त्यांची भेट घेतली. राज ठाकरेंनीही राहुल गांधींचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं”, अशी प्रतिक्रिया रणजीत सावरकरांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranjit savarkar meets mns raj thackeray rahul gandhi remarks on veer savarkar pmw