लोकसत्ता खास प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई: स्वतःची समाजमाध्यमे व्यवस्थापकाला चालविण्यास देणे २६ वर्षीय ज्युनियर आर्टिस्ट तरूणीला भलतेच महाग पडले आहे. आरोपी व्यवस्थापकाने तक्रारदार महिलेची प्रियकरासोबतची खासगी चित्रफीत वायरल करण्याची धमकी देऊन २३ लाख रुपये खंडणी उकळल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबोली पोलीस ठाण्यात खंडणी व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

तक्रारदार तरूणी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून चित्रपट व मालिकांमध्ये काम करते. आरोपी व्यवस्थापकाने २०१८ मध्ये समाजमाध्यम हाताळण्याचे आश्वासन तक्रारदार तरूणीला दिली होते. तिने विश्वासाने समाज माध्यमांबाबतचे सर्व गोपनीय पासवर्ड व इतर माहिती व्यवस्थापकाला दिली. त्यानंतर आरोपीने तक्रारदार तरूणीच्या नावाने बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. तसेच तक्रारदार तरूणीची प्रियकरासोबतची खासगी चित्रफीत तिच्या नातेवाईकांना पाठवली व ती इतरत्र वायरल करण्याची धमकी दिली.

आणखी वाचा- मुंबई महानगरपालिकेच्या नाट्यगृहांची आरक्षण शुल्कातील सवलत रद्द

त्यामुळे घाबरून तक्रारदार तरूणीने त्याला रोख १७ लाख ७४ हजार रुपये व पाच लाख १० हजार रुपये गुगल पेद्वारे दिले. त्यानंतर आरोपीने दोन मोबाइल क्रमांकावरून तरूणीला अश्लील संदेश पाठवले. त्यामुळे अखेर कंटाळून तिने याप्रकरणी अंबोली पोलिसांकडे तक्रार केली. अंबोली पोलिसांनी विनयभंग, खंडणी, धमकावणे व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या व तरूणीला पाठवण्यात आलेल्या संदेशाबाबतची माहिती समाजमाध्यम कंपन्यांकडून मागविण्यात आली. तसेच गुगल पेद्वारे पाठवलेली रक्कम स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या सहभागाबाबत तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ransom of 23 lakhs was extorted from the actress by threatening to make the video viral mumbai print news mrj