ॲप्लिकेशनच्या माध्यमातून कमी व्याज दरात कर्ज देण्याचे आमिष दाखवून खंडणी उकळल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी कर्नाटक व तेलंगणामध्ये कारवाई करून तिघांना अटक केली. आरोपींमध्ये अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर तरूणाचाही समावेश आहे. दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये या तीन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या साथादीरांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक आरोपी सामान्य नागरिकांना दूरध्वनी करून कमी व्याज दरात कर्ज देण्याच्या बहाण्याने ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगायचे. त्यानंतर त्यांच्या मोबाइलमधील गोपनीय माहिती मिळवून कर्जाची रक्कम भरण्यासाठी त्या व्यक्तीवर दबाव टाकायचे. त्यासाठी संबंधित व्यक्तीचे अश्लील छायाचित्र तयार करून ते त्याच्या संपर्क यादीतील व्यक्तींना पाठवायचे. अनेक वेळा कर्ज घेतलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम आरोपी वसूल करायचे.
सायबर पोलिसांनी या प्रकणांची गंभीर दखल घेऊन मुंबईत घडलेल्या २० गुन्ह्यांचा तपास सुरू केला.
देशभर विविध ठिकाणी शोधमाहीम हाती घेण्यात आली. लवकरच आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. या तीन आरोपींची अटक सायबर पोलिसांनी सुरू केलेल्या नव्या अभियानाचा भाग आहे. कर्ज वसुलीच्या नावाखाली धमकावल्यामुळे एप्रिल महिन्यात मालाडमधील एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. या पार्श्वभूमीवर हे अभियान हाती घेण्यात आले आहे. गेल्या आठवड्यात सायबर पोलिसांनी अशाच एका टोळीतील आरोपीला अटक केली आहे.