नाट्यशास्त्राचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ग्रामीण भागातील जगणं, कितीही दुर्दैवाचे दशावतार पाचवीला पुजलेले असले तरी जिद्दीने त्यावर मात करून पुढे जाणाऱ्या गावातील माणसांच्या कथा एकांकिकांच्या माध्यमातून रंगमंचावर जिवंत करणारा दिग्दर्शक म्हणून रावबा गजमल या तरुण दिग्दर्शकाने आपली ओळख निर्माण केली आहे. रावबाने चित्रपट दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण केले असून ‘सांगळा’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटाला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (पिफ) ‘संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटा’चा पुरस्कार मिळाला. गावकुसातल्या संघर्षाची प्रेरणादायी गोष्ट जगभरातल्या लोकांपर्यंत पोहोचावी, ही इच्छा ‘पिफ’ महोत्सवात चित्रपटाची झालेली निवड आणि पुरस्कार मिळाल्यानंतर लोकांचा चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद यामुळे पूर्ण झाली, असं रावबाने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितलं.

पुण्यात झालेल्या पिफ अर्थात पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपट स्पर्धा विभागात रावबा गजमलच्या ‘सांगळा’ या चित्रपटाची निवड झाली आणि तो चित्रपट देशी-विदेशी चित्रपटकर्मी आणि चित्रपटप्रेमींसमोर दाखवण्यात आला. तो क्षण हाच माझ्यासाठी पुरस्कार होता, अशी भावना रावबाने व्यक्त केली.

२०१९ – २० च्या दरम्यान करोनामुळे आजूबाजूचं सगळं ठप्प झालं होतं, तेव्हा ‘सांगळा’ या चित्रपटाची कथाकल्पना सुचली होती, असं तो सांगतो. ‘नाटकातून आपल्या कथा राज्यातील प्रेक्षकांपुरत्याच मर्यादित राहतात. चित्रपटांची आवड असल्याने मी विविध महोत्सवांतून जागतिक चित्रपट पाहात आलो आहे. त्यांच्या चित्रपटातून अनेकदा त्यांच्या अवतीभवतीचे विषय कथारूपात दिसतात. मग आपल्या गोष्टीही जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचायला हव्यात हा विचार मनात घर करून होता. त्यामुळे चित्रपट या माध्यमाचा विचार सुरू केला. काही प्रमाणात चित्रपटनिर्मितीसंदर्भातील व्याख्यानं शिक्षण सुरू असताना ऐकलेली होती. जुजबी तांत्रिक ज्ञान होतं, पण नाटकातून मांडली जाणारी कथा चित्रपट माध्यमापर्यंत येते तेव्हा त्यात नेमके काय बदल आवश्यक असतात हे अभ्यासण्यासाठी सुरुवातीला १५-२० मिनिटांचा एक लघुपट केला. बदल लक्षात आल्यानंतर चित्रपटाची तयारी सुरू केली’, असं रावबाने सांगितलं.

बारा दिवसांचं चित्रीकरण आणि प्रदर्शनासाठी तीन वर्षांची प्रतीक्षा…

चित्रपट करण्यासाठी नेमका किती खर्च येतो याची कल्पना नसलेल्या रावबाने ४-५ लाख रुपयांत चित्रपट तयार होईल, अशी अटकळ बांधली होती. त्यानुसार कुठल्याही परताव्याची अपेक्षा नसलेल्या एका व्यक्तीकडून आर्थिक मदतही मिळवली होती. त्याआधी निर्माते, ओटीटी कंपन्या यांच्याकडे कथा घेऊन खेटे मारून झाले होते. मात्र, ग्रामीण भागातली कथा सांगण्यासाठी सहसा कोणी पुढे येत नाही, हा अनुभव रावबानेही घेतला. करोनामुळे ऐनवेळी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिलेल्या व्यक्तीने माघार घेतली. ‘हातात होते नव्हते ते पैसे खर्च करून २०२२ च्या मे महिन्यात एका शेतात १२ दिवस चित्रीकरण पूर्ण केलं. पण त्यानंतरचे सोपस्कार संकलन, पार्श्वसंगीत, गाणी, डीआय हे सगळं करण्यासाठी खूप खर्च येणार होता. शेवटी वर्षभर ते चित्रीकरण तसंच पडून राहिलं. पुन्हा एकदा महोत्सवात चित्रपट पाहिल्यानंतर आपला चित्रपट पूर्ण करायची इच्छा उसळी मारून वर आली. जगभरात लोकांना आपले शेतकरी फक्त आत्महत्या करतात एवढंच माहिती झालं आहे. मात्र, जगण्यासाठी काही ना काही जुगाड करणाऱ्या शेतकरी बापाची धडपड, प्रतिकूल परिस्थितीतही सकारात्मकता शोधत पुढची वाट काढणारे शेतकरीही याच मातीत आहेत हे मला सगळ्यांना सांगायचं होतं. अखेर जसे पैसे येतील तसतसे परत करेन या आश्वासनावर मुंबईतील विविध तंत्रज्ञांनी मला कामं करून दिली आणि सप्टेंबर २०२४ मध्ये चित्रपट पूर्ण झाला’, अशी आठवण त्याने सांगितली.

प्रदर्शनाची अशक्य गणितं…

चित्रपट तयार झाला तरी तो प्रदर्शित करण्यासाठीही पैसे लागतात. ‘पिफ’ची घोषणा झाली आणि तिथे चित्रपट दाखवण्यासाठी कुठलीही प्रवेश फी नव्हती. त्यामुळे मी अर्ज भरला. निव्वळ महोत्सवात लोकांना चित्रपट दाखवता आला तरी खूप मिळवलं, इतकी माफक अपेक्षा होती, असं सांगणाऱ्या रावबाने पिफमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट परीक्षकांबरोबरच प्रेक्षकांकडून झालेलं कौतुक आणि चित्रपटावर पुरस्काराची उमटलेली मोहोर हा मोठाच आश्चर्याचा धक्का होता, अशी भावना व्यक्त केली.

सध्या ‘सांगळा’ हा चित्रपट जर्मनीतील स्टुटगार्ट चित्रपट महोत्सव, रोम आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवण्यात येणार आहे. खुद्द इटलीतील परीक्षकांनीच रोम महोत्सवाठी चित्रपट मागून घेतल्याचंही रावबाने सांगितलं. कान आंतरराष्ट्रीय महोत्सवात चित्रपट दाखवता यावा, यासाठी धडपड सुरू आहे, असं सांगतानाच ‘पिफ’कडूनही लातूर आणि विविध शहरांतून ‘सांगळा’ दाखवला जात आहे. मोठ्या स्तरावर नाही तर किमान वैयक्तिक स्तरावर छोटेखानी पद्धतीने चित्रपट प्रदर्शित करण्याची तयारी सुरू असल्याचंही त्याने सांगितलं.