भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी केंद्रीय राज्यमंत्री असलेले रावसाहेब दानवे यांची नियुक्ती केली जाणार असून, औपचारिक घोषणा लवकरच अपेक्षित आहे. ही घोषणा झाल्यावर ते मंत्रिपदाचा राजीनामा देणार असून, डॉ. विनय सहस्रबुद्धे यांचा समावेश केंद्रीय मंत्रिमंडळात केला जाण्याची शक्यता आहे.
प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्याने नवीन प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. दानवे हे केंद्रीय मंत्रिमंडळात आणि नवी दिल्लीत फारसे रमले नाहीत. राज्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळण्यापेक्षा राज्यात परत येऊन प्रदेशाध्यक्षपद सांभाळणे तुलनेने अधिक चांगले असल्याने दानवे यांनीही त्यासाठी होकार दिला असल्याचे समजते. दानवे यांनी नवी दिल्लीत काही दिवसांपूर्वी अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा केली. तेव्हाच पक्ष देईल, ती जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले होते. नवीन  प्रदेशाध्यक्ष नियुक्तीच्या दृष्टीने शहा यांनी शुक्रवारच्या मुंबई भेटीत संबंधितांशी चर्चाही केली.
दानवे हे मराठवाडय़ातील नेते असून गेली अनेक वर्षे ते जालन्याचे खासदार आहेत आणि राजकारणातील त्यांचा अनुभव दांडगा आहे. राज्यातील परिस्थितीची व प्रश्नांची त्यांना जाण आहे.
दानवे हे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे गटातील नेते होते. या पदासाठी दानवे यांच्याबरोबर आशीष शेलार यांचेही नाव चर्चेत होते. त्यांचे माजी अध्यक्ष व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी चांगले संबंध आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी दानवे यांच्या बाजूने मत दिल्याने त्यांची निवड करण्यात आल्याचे समजते.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात डॉ. सहस्रबुद्धे यांचा समावेश होण्याची शक्यता असून, त्यांना राज्यसभेची जागा दिली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader