रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांना सुरक्षा पुरवण्यास रेल्वे प्रशासन पुन्हा एकदा अपयशी ठरले आहे. शुक्रवारी रात्री पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट लोकलमध्ये एका अज्ञात तरुणाने २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केला. या आरोपीच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी पाच पथके स्थापन केली आहेत.
शुक्रवारी रात्री एक २२ वर्षीय तरुणी मालाड येथून चर्चगेटला आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी निघाली होती. मोटरमन केबिनला लागून असलेल्या पहिल्या महिलांच्या डब्यात ती बसली होती. तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेच्या गाडय़ा उशिराने धावत होत्या. ही लोकल रात्री ११ वाजून ५ मिनिटांनी ग्रँटरोड स्थानकाच्या फलाट क्रमांक २ वर आली. त्या वेळी एक तरुण महिलांच्या डब्यात शिरला. ती एकटी असल्याचे पाहून त्या तरुणाने तिच्यावर झडप घालून तिचा विनयभंग केला. या आरोपीने तिचे कपडेही फाडले. तिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. काही वेळात पुढच्या चर्नीरोड स्थानकात तो उडी मारून पसार झाला. विशेष म्हणजे या वेळी महिलांच्या डब्यात सुरक्षेसाठी असणारे रेल्वे पोलीस तैनात नव्हते. या तरुणीने मरिन लाइन्स स्थानक आल्यानंतर स्टेशन मास्तरांना हा प्रकार सांगितला. सविस्तर तक्रार देण्यासाठी तिला शनिवारी बोलावले होते. मात्र ती न आल्याने पोलिसांनी स्वत:हून (सुमोटो) तक्रार दाखल करून घेतली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्हीमध्ये हा संशयित तरुण दिसत असून त्याच्या शोधासाठी रेल्वे पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली. दरम्यान, या घटनेने महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राज्य महिला आयोगाच्या सदस्या चित्रा वाघ यांनी या घटनेच्या पाश्र्वभूमीवर पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रायन यांची भेट घेऊन महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली. रात्रीची वेळ असूनही डब्यात रेल्वे पोलीस का नव्हता, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असून हा रेल्वे पोलिसांचा हलगर्जीपणा असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader