पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधात एका मॉडेलने बलात्कार आणि विनयभंग यांची तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी पारसकर यांची चौकशी झाली. मुंबई पोलीस मुख्यालयात चार तास चाललेल्या या चौकशीदरम्यान पारसकर यांनी आपण संबंधित मॉडेलला ओळखत असल्याचे कबूल केले. मात्र आपल्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप निखालस खोटे असल्याचे त्यांनी जबानीत सांगितले. दरम्यान, पारसकर शुक्रवारी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज करणार असल्याची माहितीही पोलिसांतील सूत्रांनी दिली.
पोलीस उपायुक्त (गुन्हे) शारदा राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त कला गावित यांनी केलेल्या चौकशीदरम्यान पारसकर यांचा जबाब नोंदवण्यात आला, असे सह पोलीस आयुक्त (गुन्हे) सदानंद दाते यांनी सांगितले.
दरम्यान, पीडित मॉडेलने आपल्या जीवाला कोणताही धोका असल्याचे पोलिसांना सांगितलेले नाही. मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून संबंधित मॉडेललाही अशी सुरक्षा दिली जाणार असल्याचे दाते यांनी स्पष्ट केले. तसेच पारसकर यांच्या अटकपूर्व जामिनाच्या अर्जाला विरोध करण्यासारखे सबळ कारण तपासणीत पुढे आल्यास त्याचा विचार केला जाईल, असेही ते म्हणाले. पीडित मॉडेलचा जबाबही नोंदवला गेल्याचे दाते यांनी सांगितले. मात्र या मॉडेलला ऑगस्टच्या पहिल्या आठवडय़ात महानगर दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले जाणार आहे. तेथे जो जबाब नोंदवला जाईल, तोच ग्राह्य धरला जाणार आहे. पोलिसांनी जबाब नोंदवताना या मॉडेलला मढ आयलंडवरील बंगल्यात आणि नवी मुंबईतील एका सदनिकेत नेले. या मॉडेलबरोबरचा अतिप्रसंग याच दोन ठिकाणी झाल्याचे सांगितले जाते. या दोन्ही ठिकाणी पारसकर आणि मॉडेल यांना एकत्र बघितलेल्या लोकांच्या साक्षीही आम्ही नोंदवल्या आहेत. आता या दोघांमध्ये एसएमएस आणि इमेलद्वारे झालेले संभाषण ताब्यात घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असेही दाते यांनी स्पष्ट केले.
मॉडेलला ओळखत असल्याची पारसकर यांची कबुली
पोलीस उपमहानिरीक्षक सुनील पारसकर यांच्याविरोधात एका मॉडेलने बलात्कार आणि विनयभंग यांची तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी पारसकर यांची चौकशी झाली.
First published on: 29-07-2014 at 02:22 IST
TOPICSसुनील पारसकर
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rape charge cops record dig paraskars statement