अवघ्या दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील शक्तीमिल कंपाउंड बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा न देता ती जन्मठेपेची करण्यात आली असतानाच मुंबई पुन्हा एकदा अशाच एका घटनेने हादरली आहे. मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये असलेल्या एचडीआयले कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला आहे. या तरुणीवर बलात्कार करून नंतर तिची हत्या करण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
कुर्ला परिसरातील एचडीआयएल कंपाउंडमध्ये या तरुणीचा मृतदेह आढळून आला. कंपाउंडमधील एका बंद इमारतीच्या टेरेसवर हा मृतदेह सापडल्यानंतर तातडीने राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला. डॉक्टरांच्या अहवालानंतर पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात बलात्कार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच, तरुणीची ओळख अद्याप पटलेली नसून आसपासच्या पोलीस स्थानकांमध्ये बेपत्ता असल्याच्या काही तक्रारी आल्या आहेत का, याचीही खातरजमा पोलीस करत आहेत.
इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये उघडकीस आला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, काही तरून एचडीआयएल कंपाउंडमधील सदर बंद असलेल्या इमारतीवर इन्स्टाग्रामसाठी व्हिडीओ शूट करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांना टेरेसवर तरुणीचा मृतदेह आढळून आला त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी पुढील प्रक्रिया सुरू केली.
चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल!
दरम्यान, मुंबईत घडलेल्या या प्रकारानंतर भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांमध्ये टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत या घटनेचा निषेध करतानाच मुंबई आता जंगलराजच्या वाटेवर असल्याचं मत व्यक्त केलं आहे.
“मुंबईत कुर्ला इथं तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह अजूनही बेवारस पडून आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ओळखली जाणारी मुंबई आता जंगलराजच्या वाटेवर आहे. मविआ सरकारला जेवढी काळजी मुंबईच्या नाईट लाईफची आहे, तेवढीच काळजी महिलांच्या सुरक्षेची का नाही? मुंबईच्या खड्ड्यांसारखीच कायदा-सुव्यवस्थाही खड्ड्यात गेली आहे”, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.