जुहू येथील शाळेच्या बसमध्ये साडेतीन वर्षांच्या मुलीवर क्लीनरकडून बलात्कार झालेला नाही, तर त्याने या मुलीचा केवळ विनयभंग केला, असा साक्षात्कार आता पोलिसांना झाला आहे. त्यामुळे यापूर्वी जुहू पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असला तरी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी घूमजाव करीत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही चुकून बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, मात्र आरोपीने मुलीवर बलात्कार केला नाही, तर तिचा केवळ विनयभंग केला, असा दावा आयुक्तांनी केला.
 जुहू येथील एका प्रख्यात शाळेच्या बसमध्ये सोमवार, १५ जानेवारी रोजी हा धक्कादायक प्रकार घडला. या शाळेत प्ले ग्रुपमध्ये शिकणारी साडेतीन वर्षांची मुलगी घरी जात होती. सर्व मुले उतरून गेल्यावर बसचा क्लीनर रमेश राजपूत याने या मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मुलीला त्रास झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. जुहू पोलिसांकडे याबाबत तक्रार आल्यानंतर त्यांनी कडक कारवाई करत राजपूत याच्यावर बलात्काराचे ३७६ कलम तसेच  प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स अ‍ॅक्ट २०१२ या कलमाअंतर्गत त्याला अटक केली.
शनिवारी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांनी बलात्काराचा गुन्हा चुकून दाखल झाल्याचे सांगितल्याने खळबळ माजली. आमच्याकडून चुकू न बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. तथापि, न्यायालयात ते कलम रद्द केले जाईल, असे सांगितले. पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले की, विधी आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे अल्पवयीन मुलींशी प्रत्यक्ष संभोग झालेला नसला, केवळ गुप्तांगाशी चाळे केलेले असले तरीही बलात्काराचा गुन्हा दाखल करता येऊ शकतो, अशा स्वरूपाच्या तरतुदी प्रस्तावित आहेत. परंतु,अद्याप ही तत्त्वे मंजूर झालेली नसल्याने आम्ही आता तो आरोप मागे घेत आहोत. परंतु, बालकांच्या लैंगिक शोषणाचा जो गुन्हा दाखल केला आहे त्यानुसार आरोपीला अगदी जन्मठेपही होऊ शकते. बलात्काराचा गुन्हा जरी मागे घेणार असलो तरी आरोपी या गुन्ह्य़ातून सुटणार नाही आणि त्याला कडक शिक्षा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शाळेच्या व्यवस्थापनाने या बस ठेकेदाराचे कंत्राट रद्द करीत असल्याचे जाहीर केले आहे.
महिला मदतनिसाने हटकले होते..
बसमधील महिला मदतनीस वीणा महाडिक हिने आपण मुलांना खाली उतरवत असताना हा प्रकार झाल्याचे सांगितले. आपण राजपूत याला असा प्रकार करताना हटकले असल्याचेही तिने सांगितले. पोलीस आता तिच्या मोबाइलचे लोकेशनही तपासून  तिच्या म्हणण्याची सत्यता पडताळत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा