मुंबईतल्या अंबोली भागात एका विदेशी महिलेवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीच्या विरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. हा आरोपी फरार आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलंडमधल्या एका महिलेवर मुंबईत बलात्कार झाला. या महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मनिष गांधी याने आपल्या नोव्हेंबर २०१६ ते २०२२ या कालावधीत अनेकदा बलात्कार आणि लैंगिक शोषण केलं आहे तसंच मनिष गांधी मला ब्लॅकमेल करत होता असंही या पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.
नेमकी काय घडली घटना?
ही पीडित महिला अंधेरीच्या कंपनीत काम करत होती. त्यावेळी मनिष गांधीने माझं नाव वापरून अश्लील कहाणी तयार केली आणि व्हिडिओ पाठवून मला लाज आणली. अनेकदा लाज वाटेल असं वर्तन मनिष गांधी याने केलं असंही या पीडित महिलेने सांगितलं. महिलेच्या तक्रारीनंतर आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. NDTV ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.मी कुठल्याही कामासाठी त्याच्यासोबत जर्मनी, गोरेगाव, दिल्ली किंवा इतर जागी गेले होते तेव्हा त्याने माझे फोटो काढले आणि मला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला असंही या पीडित महिलेने सांगितलं
मनिष गांधी दीर्घ काळापासून महिलेला करत होता ब्लॅकमेल
आरोपी मनिष गांधी बऱ्याच काळापासून मला ब्लॅकमेल करत होता आणि माझं शोषण करत होता. त्याने मला ही धमकी दिली होती की जर तू माझं ऐकलं नाही तर तुझे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ तुझ्या नातेवाईकांना पाठवून देईन. महिलेने ही तक्रार केल्यानंतर मनिष गांधीच्या विरोधात ३५४ A, ३५४ सी, ५०९, ५०६ या कलमांच्या अंतर्गत आणि ६७ ए, ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलंडमधून महिला नोकरीसाठी भारतात आली होती
पोलंडहून एक महिला भारतात नोकरीसाठी आली. तिला Asian Business Exhibitions and Conferences Ltd (ABECL)चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनिष गांधी यांनी नोकरीची ऑफर देऊ केली. सुरुवातीचे काही महिने खूप छान गेले. मात्र, मनिष गांधी पीडितेला त्रास देऊ लागला. तिच्या मोबाईलवर अश्लिल चित्रफित पाठवून तिच्याशी जवळीक साधू लागला. त्यानंतर, जर्मनीमध्ये एका प्रदर्शनासाठी दोघेही गेले होते. तेथे एका हॉटेलवर मनिषने पीडितेवर बलात्कार केला. या काळात त्याने तिचे अनेक अश्लिल फोटो आणि व्हिडीओ काढले होते. हे फोटो आणि व्हिडीओ दाखवून तो तिला धमकावत असे. २०१७ ते २०२२ दरम्यान सातत्याने आरोपीने पीडितेवर बलात्कार केला. या काळात तिने तिच्या मायदेशी परत जाण्याचाही निर्णय घेतला. परंतु, तिच्याकडील सर्व आवश्यक कागदपत्रे मनीष गांधी याने काढून घेतल्याने ती परत पोलंडला जाऊ शकत नव्हती. या सर्व प्रकारामुळे पीडिता अत्यंत तणावात गेली. अखेर तिने आपल्या वकिलांच्या मार्फत अंबोली पोलीस ठाण्यात मनीष गांधीविरोधात तक्रार दाखल केली. यासाठी तिने सर्व फोटो, व्हिडीओ आणि चॅट्सही पोलिसांना सादर केले.
पीडितेचं सात वर्षांपासून ब्लॅकमेलिंग
पीडितेच्या वकिलांनी सांगितलं की, पीडिता गेल्या सात वर्षांपासून लैंगिक अत्याचार सहन करत आहे. तिचे खासगी छायाचित्र वापरून तिला धमकावलं गेलं. तिचा लैंगिक छळ केला गेला. त्यामुळे ती चिंता, पॅनिक अटॅक, झोपेच्या समस्या, भयानक आघात आणि नैराश्य आदी विविध मानसिक समस्यांतून जात आहे. या संपूर्ण धक्क्यातून बाहेर पडण्याकरता तिला वर्षभराचा कालावधी लागला. त्यानंतर तिने धीर एकवटून आरोपीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे तिने आता याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली आहे.