विरार येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन तरुणीवर दोघांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. समतानगर पोलिसांनी याप्रकरणी एका इस्टेट एजंटला अटक केली असून त्याच्या फरारी साथीदाराचा शोध सुरू आहे.
अवंतिका (नाव बदललेले) ही १७ वर्षांची तरुणी आई आणि तीन भावांसोबत विरार येथे राहते. एका आजारी नातेवाईकाला बघण्यासाठी तिचे भाऊ आणि आई कर्नाटकात आपल्या गावी गेले होते.
दरम्यान, पालिकेने अवंतिकाचे घर अनधिकृत असल्याने तोडले होते. त्यामुळे ती तातडीने घर बघत होती. तिची कृष्णा मुश्ताद (२६) या इस्टेट एजंटशी ओळख झाली. त्याने तिला घर मिळवून देण्याचे आश्वासन दिले आणि अवंतिकाने त्याला पाच हजार रुपयांची आगाऊ रक्कमही दिली होती. गुरुवारी कृष्णाने तिला भेटण्यासाठी कांदिवली येथे बोलावले होते. तेथे कृष्णाचा एक मित्र विवेक मोरे (२२) हा सुद्धा होता. एका मॉलमध्ये जेवण घेतल्यानंतर या दोघांनी तिला शीतपेय प्यायला दिले. त्यानंतर अवंतिका बेशुद्ध झाली. तिला जेव्हा जाग आली तेव्हा रात्री दीडच्या सुमारास ती पश्चिम द्रुतगती मार्गावर रस्त्याच्या कडेला पडलेली
होती.
आपल्यावर बलात्कार झाल्याचे तिच्या लक्षात आले. याप्रकरणी तिने समतानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी कृष्णा आणि त्याच्या मित्रावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून कृष्णाला अटक केली आहे. अवंतिकावर भगवती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा