मुंबई: लग्नाचे अमिष दाखवून ३४ वर्षीय महिलेवर एका तरुणाने अनेकदा बलात्कार केल्याची घटना विक्रोळीत घडली होती. या प्रकरणातील पीडित महिलेने स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली असून विक्रोळी पोलिसानी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. विक्रोळीमधील टागोर नगर परिसरात पीडित महिला वास्तव्यास होती.
हेही वाचा >>> मुलुंड महानगरदंडाधिकारी न्यायालयाच्या इमारतीची दुरावस्था, उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल
याच परिसरात राहणाऱ्या जिशान बेग (३२) याच्यासोबत महिलेचे अनेक दिवसांपासून प्रेमसबंध होते. याच दरम्यान आरोपीने महिलेला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला होता. मात्र काही महिन्यानंतर बेगने लग्नास नकार दिल्याने पीडित महिलेने याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्यानंतर महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने न्यायालयाने आरोपीची जामिनावर मुक्तता केली होती. आरोपीने महिलेनेकडून घेतलेले काही पैसे परत केले नव्हते. अनेक वेळा विनंती, विनवणी केल्यानंतरही आरोपी पैसे देत नव्हता. अखेर पीडित महिलेने २१ फेब्रुवारी रोजी अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तिच्या कुटुंबीयांनी तत्काळ तिला शिव रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान बुधवारी महिलेचा मृत्यू झाला. उपचार सुरू असतानाच पोलिसांनी तिचा जवाब नोंदवून घेतला असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.