Raped on minor in Mumbai : गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आजूबाजूच्या शहरांमधून महिला अत्याचारांच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. कल्याण शिळफाटा बलात्कार प्रकरण, उरण हत्या प्रकरण उजेडात आल्यानंतर आता एका १० वर्षीय चिमकुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणातील ३० वर्षीय तरुणाला रविवारी मुंबई पोलिसांनी अटक केली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मतदानासाठी आईसह आली होती मुंबईत

पीडित मुलगी ठाणे येथे राहते. मे महिन्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान मुंबईत पार पडलं. मतदानासाठी चिमुकलीची आई मुंबईतील पूर्व उपनगरात आली होती. आई मतदान करायला गेली असताना तिने आपल्या लेकीला विश्वासाने तिच्या बहिणीच्या घरी ठेवलं. मुलीला सांभाळायला बहिणीच्या पतीने त्यादिवशी सुट्टी काढली होती. परंतु, याच संधीचा फायदा या नराधमाने घेतला. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकारामुळे ती पुरती घाबरली होती. त्यामुळे तिने यासंदर्भात आईला काहीही सांगितलं नाही.

हेही वाचा >> Navi Mumbai Girl Murder : उरण प्रकरणात मोठी अपडेट समोर; पोलीस म्हणाले, “२०१९ मध्ये पीडितेच्या वडिलांनी…”

पुन्हा त्याच ठिकाणी जाण्याच्या भीतीने तिनं सांगितली आपबिती

दरम्यान, याच आरोपीच्या मुलाच्या वाढदिवसाला पीडितेला आणि तिच्या आईला शनिवारी आमंत्रित करण्यात आले. परंतु, तिथे पुन्हा जायचं या विचारानेच मुलीला घाम फुटला. ती पुन्हा भयभीत झाली. त्यामुळे तिने तिथं जाण्यास नकार दिला. तिथं का जायचं नाहीय? असं पीडित चिमुकलीला विचारलं तेव्हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराची माहिती आईला दिली. ही धक्कादायक माहिती ऐकताच तिच्या आई-वडिलांनी थेट पोलीस ठाणे गाठले. आईने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी रविवारी सकाळी आरोपीला अटक केली.

हेही वाचा >> भव्य जनआक्रोश मूक मोर्चा, पीडित महिलेचा खटला जलदगती न्यायालयात वर्ग करा… 

पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी

आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (बलात्कार), ५०६ (धमकी देणे) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायद्याच्या ४, ५ (एम), ६, ८ आणि १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने परिसरातील इतर मुलींनाही अशाप्रकारे लक्ष्य केले आहे का हेही पोलीस आता तपासणार आहेत. या अल्पवयीन मुलीची वांद्रे येथील भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मुंबईत महिला सुरक्षित?

दरम्यान,कल्याण शिळफाट येथे झालेल्या बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तर उरण हत्या प्रकरणीही वेगाने चौकशी सुरू आहे. हे दोन्ही प्रकरणे ताजी असतानाच मुंबईतील बलात्कार प्रकरण समोर आल्याने आता मुंबईकरांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकरणांमुळे महिला खरंच सुरक्षित आहेत का? असा प्रश्न सामान्य मुंबईकरांनी विचारला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raped on minor in mumbai accused arrested after victims mother files complaint sgk