मुंबई : राज्यात वेगाने पसरणाऱ्या जनावरांवरील लम्पी आजाराचा प्रादुर्भाव निंयत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाने पशुसंवर्धन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची स्थापना केली आहे. त्यात पशुचिकित्सा, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सुक्ष्मजीवशास्त्र, आदी तज्ज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या रोगापासून जनावरांना वाचविण्यासाठी व प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर देण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यात ४ ऑगस्ट २०२२ रोजी जळगाव जिल्ह्यात प्रथमत: गोवंशीय पशुधनात विषाणूजन्य लम्पी चर्मरोगाचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर १४ सप्टेंबपर्यंत राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले. या विषाणूजन्य रोगाचा वेगाने होणारा फैलाव रोखण्यासाठी केंद्र शसानाच्या प्राण्यांमधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार संपूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी तशी अधिसूचना जारी केली आहे.

राज्य शासनाने आता या रोगाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी आयुक्त, पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली कृती गटाची (टास्क फोर्स) स्थापना केली आहे. त्यात संचालक शिक्षण विस्तार, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, वरिष्ठ उपाध्यक्ष भारतीय कृषी औद्योगिक प्रतिष्ठान, संशोधन संचालक, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, संचालक, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, प्रधान शास्त्रज्ञ, भारतीय पशुचिकित्सा अनुसंधान संस्था, विभागप्रमुख परोपजीवीशास्त्र, पशुवैदकीय महाविद्यालय, परभणी, विभागप्रमुख, सुक्ष्मजीवशास्त्र पशुवैद्यकीय महाविद्यालय, परळ, मुंबई आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या कृती गटाच्या माध्यमातून राज्यातील लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाचा आढावा घेणे, प्रादुर्भाव नियंत्रणात आणणे व त्याच्या निर्मूलनासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rapid action teams formed for control of lumpy skin disease in maharashtra zws